ठसा – विनय मांडके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार लक्ष्मीकांत बेर्डेला विनय मांडके यांचा आवाज एकदम फिट्ट बसला आणि या जोडीच्या अनेक गाण्यांनी त्या काळात प्रचंड लोकप्रियता संपादन केली. तो रेडिओच्या जोडीला ध्वनिफिती (पॅसेट) आणि लाऊडस्पिकरचा काळ होता. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘हमाल दे धमाल’ या सिनेमामधील गोकुळाष्टमी सणाच्या ‘ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम… अरे एक दोन तीन चार…’ गाण्यात विनय मांडकेच्या उत्स्फूर्त पार्श्वगायनावर नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांच्या स्टेप्सवर लक्ष्मीकांत बेर्डेनी अतिशय उत्स्फूर्त धमाल असा परफॉर्मन्स केला होता. अनिल मोहिले यांचे या चित्रपटाला संगीत आहे. या समूह गीत-नृत्याच्या लोकप्रियतेने विनय मांडकेचा आवाज घराघरात पोहोचला. अर्थात पुरस्काराबाबत त्यांची बरीचशी उपेक्षाच झाली. मध्यमवर्गीय संस्कारांत वाढलेल्या विनय मांडके यांचे गीत-संगीत ध्वनिमुद्रण स्टुडिओतील वावर अतिशय दिलखुलास आणि मैत्रीपूर्ण असे. चित्रपटसृष्टी, वाद्यवृंद क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात विनय मांडपेंचा अनेकांना सहकार्याचा हात असे हे विशेष उल्लेखनीय. कालांतराने मोनिष बाबरे निर्मित आणि शेखर सरतांडेल दिग्दर्शित आणि 2016 साली पडद्यावर आलेल्या भगवानदादा यांच्या जीवनावर आधारित ‘एक अलबेला’ या चित्रपटातील ‘भोली सूरत दिल के खोटे’, ‘शाम ढले खिडकी तले’ ही दोन गाणी संगीतकार संतोष मुळेकर यांनी पुनर्निर्मिती करताना विनय मांडके यांच्याकडून आवर्जून गाऊन घेतली होती. त्यामुळे 1997 सालापासूनचा अज्ञातवास संपून विनय मांडके पुन्हा चित्रपटसृष्टीत परतले होते. विशेष म्हणजे, ‘अलबेला’ (1951) या चित्रपटाचे संगीतकार आणि पार्श्वगायक सी. रामचंद्र यांच्या ‘भुलाए न बने’ या वाद्यवृंदात ऐंशीच्या दशकात विनय मांडके यांनी गायन केल्याचा अनुभव यावेळी त्यांना उपयोगी आला. खरं तर आता विनय मांडके यांच्या कला प्रवासाला पन्नास वर्षे पूर्ण होत आली होती. सत्तरच्या दशकाच्या मध्यास ते मिलन

ऑर्पेस्ट्रात गात. विशेषतः ‘झुमरु’ या चित्रपटातील किशोर कुमारचे सर्वकालीन सुपरहिट गाणं ‘मै हूं झुम झुम झुमरु’ हे विनय मांडके अतिशय उत्स्फूर्तपणे गात असत. मग हेच गाणं ते प्रमिला दातार यांच्या ‘सुनहरी यादे’ या वाद्यवृंदात गात होते आणि त्याच वेळेस शुभंकरोती चित्र या बॅनरखाली निर्माण होत असलेल्या गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित ‘बन्या बापू’ या चित्रपटातील ‘हे गर्द निळे मेघ’ हे मुरलीधर गाडे यांनी लिहिलेले गाणे अनुराधा पौडवाल यांच्यासह गाण्याची संधी संगीतकार ऋषिराज या जोडीतील नागेश सुर्वे यांनी दिली.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी चित्रपटात विनोदीपटाची लाट आली आणि त्यात लक्ष्मीकांत बेर्डे हुकमी नायक ठरला. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांची रुपेरी पडद्यावरील अनेक गाणी विनय मांडके यांनी गायली. महिमा ज्योतीबाचा, हाच सुनबाईचा भाऊ, वाजवा रे वाजवा, तू सुखकर्ता, गंध मातीला आला, साखरपुडा, जसा बाप तशी पोरं, अबोली, घरंदाज, बजरंगाची कमाल, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, धमाल बाबल्या गणप्याची, शेम टू शेम, बाळाचे बाप ब्रह्मचारी, मुंबई ते मॉरिशस, राजानं  वाजवला बाजा अशा अनेक मराठी तसेच हिंदी, गुजराती व अन्य भाषांतील मिळून शंभरपेक्षा अधिक चित्रपटांतील गाणी त्यांनी गायली.

हमारा बजाज, व्हीआयपी लगेजची ‘कल भी आज भी.’ ब्रिटानिया फिफ्टी फिप्टी, लाइफबॉय, प्रेस्टिज कुकर, विको वज्रदंती, निरमा व्हिल अशा शेकडो जाहिरातींच्या जिंगलमध्ये विनय मांडके यांचा आवाज आहे. विनय मांडके यांनी गाण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नव्हते. प्राथमिक धडेही ज्यांनी कधी गिरवले नव्हते, मात्र गायनाची आवड, हौस आणि परिश्रम या गुणांवर विनय मांडके यांनी चित्रपट संगीत क्षेत्रात स्वतःची एक शैली निर्माण केली. त्या काळातील आघाडीच्या सर्व गायक मंडळींसोबत त्यांनी पार्श्वगायन केले हे विशेष उल्लेखनीय. मी स्वतःला गायक, पार्श्वगायक अजिबात समजत नाही, मी करमणूककार आहे अशा शब्दांत ते स्वतःचे वर्णन करत असत. वाद्यवृंद कार्यक्रमातील लाईव्ह परफॉर्मन्स आणि चित्रपटासाठीचे पार्श्वगायन याचा त्यांनी उत्तम समतोल साधला होता.