तुरुंगातून सुटकेनंतर सोनम वांगचुक कारगिलमध्ये करणार पहिलीच जनसभा, लडाखच्या हक्कांसाठी देणार लढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक ५ एप्रिल रोजी कारगिलमध्ये एका मोठ्या जनसभेला संबोधित करणार आहेत. जोधपूर तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच कारगिल दौरा असून, या सभेकडे संपूर्ण लडाखचे लक्ष लागले आहे. कारगिलमधील बारू येथील गांधी पार्क येथे सकाळी ११ वाजता ही सभा पार पडणार असून, कारगिल डेमोक्रेटिक अलायन्सने या सभेची जय्यत तयारी केली आहे, असे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे.

लडाखला राज्याचा दर्जा मिळवणे आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी करणे या मागण्यांसाठी वांगचुक यांचा लढा सुरू आहे. गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये आंदोलन करत असताना त्यांना अटक करण्यात आली होती. प्रदीर्घ काळ जोधपूर जेलमध्ये राहिल्यानंतर १४ मार्च २०२६ रोजी त्यांची सुटका झाली. आपल्या सुटकेसाठी ज्या कारगिलवासीयांनी आवाज उठवला आणि संघर्ष केला, त्यांचे आभार मानण्यासाठी वांगचुक या दौऱ्यावर येत आहेत.

सज्जाद कारगिली यांनी या सभेची अधिकृत माहिती दिली असून, या सभेच्या माध्यमातून लडाखच्या घटनात्मक हक्कांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला जाणार आहे. वांगचुक यांच्या या दौऱ्यामुळे लडाखमधील आंदोलनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.