कुर्ला पोलीस वसाहतीत पॉड टॅक्सी टर्मिनल, पोलीस कुटुंबीय आंदोलनाच्या पवित्र्यात; वरळी बीडीडीच्या धर्तीवर मालकी हक्काने घरे देण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला पोलीस वसाहत जमीनदोस्त करून त्याजागी एमएमआरडीएकडून पॉड टॅक्सी टर्मिनल उभारण्यात येणार आहे. गेल्या तीन ते चार पिढ्यापासून या वसाहतीत राहणाऱया पोलीस कुटुंबीयांनी प्रस्तावित पॉड टॅक्सी टर्मिनलला जोरदार विरोध दर्शवला आहे. नायगाव आणि वरळी बीडीडी चाळींच्या धर्तीवर कुर्ला पोलीस वसाहतीमधील कुटुंबियांना मालकी हक्काने घरे देण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कुर्ला पोलीस वसाहतीमध्ये तीन इमारती असून यात पोलिसांची सुमारे शंभर कुटुंबे वास्तव्यास आहेत. याच वसाहतीत गुन्हे शाखेचे कार्यालय, पोलीस आस्थापनांची तीन कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभागाचेदेखील कार्यालय आहे. वसाहतीच्या 6500 चौरस मीटर भूखंडावर पॉड टॅक्सी टर्मिनस उभारण्यात येणार असून सर्वेक्षणासाठी आलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱयांना पोलीस कुटुंबियांनी पिटाळून लावले. बेकायदेशीररीत्या झोपडय़ा उभारणाऱयांना सरकारकडून मोफत घरे दिली जातात. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत दुजाभाव का, असा सवाल असोसिएशनने केला आहे.

पॉड टॅक्सी टर्मिनलला आमचा विरोध नाही; पण तीन ते चार पिढय़ांपासून कुर्ला पोलीस वसाहतीत राहणाऱया पोलिसांच्या कुटुंबियांना याच ठिकाणी वरळी, नायगाव बीडीडी पुनर्वविकासप्रमाणे मालकी हक्काने घर मिळावे एवढीच आमची मागणी आहे. – निशांत घाडगे, सचिव, हाउसिंग सोसायटी

रहिवाशांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

घराच्या या प्रश्नावर न्याय मागण्यासाठी कुर्ला पोलीस वसाहत वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.