
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सत्ताधाऱयांसह शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी केल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत आहेत, तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी मतदारसंघात भाजपने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी स्पष्ट केले.
कॉँग्रेसकडे बारामतीसाठी सहा अर्ज तर राहुरीसाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत. उमेदवार निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सपकाळ म्हणाले.
जानकर, आंबेडकरांची काँग्रेसला साथ
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली आहे.
काँग्रेसने मोठे मन दाखवावे – बावनकुळे
काँग्रेस नेत्यांना अजित पवार यांचा दीर्घकाळ सहवास लाभला आहे. बारामती ही अजित पवार यांचीच जागा आहे. आयुष्यभरातील राजकारणात 75 टक्के काळ त्यांनी काँग्रेस नेत्यांसोबत घालवला आहे. बारामतीमध्ये अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे किमान काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे, असे आवाहन भाजप नेते-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.




























































