
एकीकडे इराण युद्ध वेगळय़ा वळणावर आले असताना हिंदुस्थानला पाकिस्तानने धमकी दिली आहे. हिंदुस्थानविरोधात पुन्हा संघर्ष झाल्यास पाकिस्तान हिंदुस्थानात शिरून हल्ला करेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या शिबिरात आणि लोकांच्या घरात घुसून मारू, अशी भ्याड धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केरळमध्ये प्रचारादरम्यान पाकिस्तानला इशारा दिला होता. त्यावरून चवताळलेल्या पाकिस्तानने लोकांच्या घरात घुसून हल्ले करू, अशी धमकी देत पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला आहे.
राजनाथ सिंह गुरुवारी म्हणाले होते की, पाकिस्तानने सीमेवर कोणतेही धाडस केल्यास कधीही झाली नाही अशी कारवाई आम्ही करू, ही कारवाई निर्णायक असेल. त्यावर आसिफ यांनी प्रतिक्रिया देताना हिंदुस्थानला धमकी दिली. ते म्हणाले की, हिंदुस्थानने कारवाई केल्यास संघर्ष केवळ 200 ते 250 किलोमीटरपर्यंत राहणार नाही. आम्ही त्यांच्या हद्दी, त्यांच्या घरांमध्ये शिरून त्यांना मारू. त्यांनी पुन्हा असे काही केल्यास त्यांची गेल्या वर्षीपेक्षा जास्त नाचक्की होईल, असे आसिफ म्हणाले.
पेट्रोल 458 आणि डिझेल 520 रुपये
पाकिस्तानात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलच्या किमतीत 43 टक्के वाढ झाली तर डिझेलच्या किमती 55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पेट्रोल प्रति लिटर 458 रुपये तर डिझेल 520 रुपये लिटरने विकले जात आहे. याआधीच पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. परंतु इराण-इस्रायल युद्धामुळे आता यात आणखी भर पडली आहे. ऊर्जा आणि खाद्य सुरक्षा ध्यानात ठेवून काही निर्णय घेतले जात आहेत, असे पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब म्हणाले.


























































