
एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असतानाच मुंबईकर मात्र दूषित आणि कमी दाबाने होणाऱया पाणीपुरवठय़ामुळे हैराण झाले आहेत. दूषित पाण्यामुळे शहरातील विविध भागांत गॅस्ट्रो, टायफॉइडसारख्या आजारांचा प्रसार होण्याची भीती आहे. फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अंदाज वर्तवत महापालिकेने गळक्या जलवाहिन्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. ही पथके 24 तास निगराणी करणार आहेत.
दूषित पाण्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी जल अभियंता खात्याच्या अधिकाऱयांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीत बांगर यांनी दूषित पाण्याचा उगम शोधण्यासाठी आणि तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विना विलंब ‘24 x 7’ विशेष पथकाची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत.
कडक कारवाईचा इशारा
विविध विभागांमध्ये दूषित पाणी आणि कमी दाबाने पुरवठा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेला मिळाल्या आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या. तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱया अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

























































