एल्फिन्स्टन पुलावर आज अखेरचा हातोडा, मध्य रेल्वेवर रात्री साडेदहानंतर ‘महाब्लॉक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवळपास 125 वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल शनिवारी रात्री पूर्णपणे जमीनदोस्त केला जाणार आहे. हे ‘मिशन एल्फिन्स्टन’ फत्ते केले जात असतानाच या पुलावरील ब्रिटिशकालीन पाऊलखुणा कायमच्या मिटणार आहेत. पूल पाडकामाचा अंतिम टप्पा पूर्णत्वास नेण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दादर स्थानकांदरम्यान साडेसात तासांचा ‘महाब्लॉक’ घेतला आहे. शनिवारी रात्री 10.30 ते रविवारी पहाटे 6 वाजेपर्यंत सीएसएमटी ते दादर रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या काळात अनेक लोकल फेऱया रद्द केल्या जाणार असून मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. या ‘महाब्लॉक’चा संपूर्ण रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने लाखो प्रवाशांची शनिवार आणि रविवारच्या प्रवासात रखडपट्टी होणार आहे.

वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम हाती घेण्यात आले, मात्र सहा महिने पाडकाम रेंगाळले. अखेर शनिवारी रात्रीच्या ‘महाब्लॉक’दरम्यान पूल पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर उपनगरी गाडय़ांबरोबरच अनेक मेल-एक्सप्रेस धावतात. त्या सर्व वाहतुकीच्या विचार करून एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले होते. मध्य रेल्वेकडून सर्वात मोठय़ा ब्लॉकसाठी परवानगी रखडली होती. गेल्या आठवडय़ात परवानगीचा गुंता सुटला आणि एल्फिन्स्टन पूल पाडकामाच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली. याअंतर्गत शनिवारी रात्रभर सीएसएमटी ते दादरदरम्यान संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद ठेवून पुलाचे पाडकाम केले जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी सीएसएमटी ते दादरदरम्यान शनिवारी रात्री 10.30 ते रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लोकल वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱया नोकरदारांची रखडपट्टी होणार आहे. तसेच मुंबईत ये-जा करणाऱया अनेक मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे वेळापत्रक ब्लॉक काळात बदलण्यात आले आहे. अनेक गाडय़ा सीएसएमटीऐवजी दादर, ठाणे किंवा पनवेल येथून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या गाडय़ा गाठण्यासाठी प्रवाशांची धावाधाव उडणार आहे. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला आणि आजारी नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे.

ब्लॉकचा लोकलवर परिणाम
– सीएसएमटी ते दादरदरम्यान शनिवारी रात्री 10.30 वाजल्यापासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण लोकलसेवा बंद राहणार.
– ठाणे ते डोंबिवलीदरम्यान लोकल सेवा बंद असेल. तेथील ब्लॉक काळात काही लोकल दादर किंवा कुर्ला स्थानकांवरूनच चालवणार.
– शनिवारी रात्री 10.49 ते 12.33 वाजता दादरहून सुटणाऱया आणि पहाटे 4.45 वाजता विद्याविहारहून सुटणाऱया ते रविवारी सकाळी 9.05 वाजता सीएसएमटी येथून सुटणाऱया डाऊन धिम्या लोकल मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार
– शनिवारी रात्री 11.26 ते 11.52 या वेळेत आणि रविवारी पहाटे 3.23 ते सकाळी 9.55 या वेळेत कल्याण येथून सुटणाऱया अप धीम्या लोकल कल्याण आणि मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार.

मेल/एक्स्प्रेस गाडय़ांवर परिणाम

ब्लॉक काळात शनिवारी आणि रविवारच्या मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे वेळापत्रक आणि स्थानक यात मोठा बदल केला आहे. मध्य रेल्वेने दोन दिवसांतील 15 एक्सप्रेस गाडय़ांच्या सेवा सीएसएमटीऐवजी दादर स्थानकातून चालवण्याचे नियोजन केले आहे. यात गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस, अमृतसर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आदी गाडय़ांचा समावेश आहे. त्याचबरोबर डाऊन मेल-एक्सप्रेस गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

ठाणे ते डोंबिवली सकाळी 10 पर्यंत ब्लॉक

एल्फिन्स्टन पुलाच्या कामाबरोबरच ठाणे आणि डोंबिवली स्थानकांमधील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे. त्या कामासाठी शनिवारी रात्रीच विशेष ‘ट्रफिक पॉवर ब्लॉक’ घेण्यात आला आहे. ठाणे ते डोंबिवलीदरम्यान शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मुलुंड ते ठाणे (क्रॉसओव्हर्स वगळून) आणि दिवा (क्रॉसओव्हर्स वगळून) ते डोंबिवली (प्लॅटफॉर्मसह) अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे.