
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या ओमकार ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला आज पहाटे अडीचच्या सुमारास नागोठण्याजवळील सुकेळी खिंडीत भीषण अपघात झाला. खिंडीतील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून ही बस उलटली. त्यात दोन प्रवासी जागीच ठार झाले असून २१ जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, सर्व जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले आहे.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने ओमकार ट्रॅव्हल्सची बस पहाटे अडीचच्या सुमारास सुकेळी खिंडीत येताच चालक हेमंत पाटील याने घाटातील तीन वळणाकडे दुर्लक्ष केले. वेगात बस नेत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. पहाटेची वेळ असल्याने साखरझोपेत असलेले प्रवासी आवाजाने खाडकन जागे झाले. काय झाले हे क्षणभर त्यांना समजेना. अनेक प्रवासी एकमेकांवर आदळले, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक जीवाच्या आकांताने ओरडत होते. या अपघातात पनवेल येथे राहणाऱ्या नीलम विभुते व कामोठे येथील नईम शेख हे दोघे प्रवासी ठार झाले.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने ओमकार ट्रॅव्हल्सची बस पहाटे अडीचच्या सुमारास सुकेळी खिंडीत येताच चालक हेमंत पाटील याने घाटातील तीव्र वळणाकडे दुर्लक्ष केले. वेगात बस नेत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. पहाटेची वेळ असल्याने साखरझोपेत असलेले प्रवासी आवाजाने खाडकन जागे झाले. काय झाले हे क्षणभर त्यांना समजेना. अनेक प्रवासी एकमेकांवर आदळले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक जीवाच्या आकांताने ओरडत होते. या अपघातात पनवेल येथे राहणाऱ्या नीलम विभुते व कामोठे येथील नईम शेख हे दोघे प्रवासी ठार झाले.
खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात एवढा भीषण होता की अनेकांच्या हातापायाला जखमींना नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरते उपचार करून त्यांना विविध रुग्णालयात हलवले आहे. अपघाताचे वृत्त समजताच नागोठणे पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी तातडीने सुकेळी खिंडीकडे धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना नवी मुंबई, मुंबई तसेच रोहा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या ओमकार ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसमध्ये एकूण ४६ प्रवासी होते. त्यातील अनेक जण हे गोवा फिरण्यासाठी जात होते, पण दुर्दैवाने त्यांना अपघाताला सामोरे जावे लागले.
स्थानिकांची तत्परता
सुकेळी खिंडीत खासगी बसला अपघात झाल्याचे समजताच नागोठणे व परिसरातील ग्रामस्थ, बचाव पथक, फॉरेन्सिक यांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. त्यांनी तत्परता दाखवल्यामुळेच जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले. या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.




























































