
जेएनपीएच्या बीएमसीटी या चौथ्या बंदराशी जोडणारा उड्डाणपूल अचानक खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील कंटेनर वाहतूक बंद करण्यात आली आहे. ६८ कोटी रुपये खर्चुन बांधलेला उड्डाणपूल केवळ दहा महिन्यांत खराब झाला कसा, असा सवाल विचारण्यात येत आहे.
जेएनपीएअंतर्गत सिंगापूर पोर्ट हे खासगीकरणाच्या माध्यमातून सर्वात मोठ्या लांबीचे चौथे बंदर उभारण्यात आले आहे. सुमारे १३ हजार कोटींहून अधिक खर्चाचे हे बंदर कार्यान्वितही झाले आहे. या बंदरातून वर्षाकाठी ५० लाख कंटेनर मालाची वाहतूक केली जाणार आहे. चौथ्या बंदराशी जोडणाऱ्या ७०० मीटर लांबीचे दुपदरी उड्डाणपूल उभारण्याचे काम जेएनपीएने एनएचएआय कंपनीकडे सोपविण्यात आले होते. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला होता. मात्र जसखार रत्नेश्वरी मंदिराच्या बाजूनेच जाणारा उड्डाणपुलाचा काही भाग तडा जाऊन खचला आहे.
दर्जाबाबत शंका
१० महिन्यांपूर्वीच खुला करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा भाग खचल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील कंटेनर वाहतूक बंदर करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जेएनपीए अधिकाऱ्यांकडून देण्यात आली, तर उड्डाणपुलावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असल्याचे न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले.




























































