
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने घेतलेली इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. या मार्गावर चौक ते कर्जत दरम्यान विनाअडथळा प्रथमच डिझेल इंजिन धावले आहे. कर्जत-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या मार्गाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. पनवेल आणि कर्जत रेल्वे स्थानकानजीक तयार होणाऱ्या उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या चार महिन्यांत या मार्गावर लोकल सेवा सुरू होणार आहे.
पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरवर एमआरव्हीसीच्या माध्यमातून नुकतीच डिझेल इंजिनची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी चौक रेल्वे स्थानकातून डिझेल इंजिन या नवीन मार्गिकेवर वळवण्यात आली. त्यानंतर या इंजिनने कर्जतच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. वसुर्ली येथे इंजिन आल्यानंतर एमआरव्हीसीचे वरिष्ठ अधिकारी या इंजिनमध्ये बसले. प्रथमच या मार्गावर रेल्वे इंजिन आल्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणारे कामगार यांनी मोठा जल्लोष केला. याच जल्लोषात हे इंजिन नवीन कर्जत रेल्वे स्थानकात पोहोचले. त्या ठिकाणी इंजिनची पूजा करण्यात आल्यानंतर ते पुन्हा चौकच्या दिशेने रवाना करण्यात आले. पहिलीच चाचणी यशस्वी झाल्यामुळे रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
२९ किमीचा मार्ग, तीन हजार कोटींचा खर्च
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर हा २९.६ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे तीन हजार कोटींचा आहे. पनवेल, चिखले, पोयंजे, चौक, कर्जत अशी रेल्वे स्थानके या मार्गावर आहेत. तीन बोगदे, आठ मोठे पूल, ३२ छोटे पूल, पाच रोड ओव्हरब्रीज आणि १५ रोड अंडरब्रीज या मार्गावर तयार करण्यात आले आहेत. या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आता एमआरव्हीसीने जुलै २०२६ ही नवीन डेडलाईन जाहीर केली आहे.




























































