४८ तासांत डील करा, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा; ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कडक इशारा दिला असून डील करण्यासाठी आता केवळ ४८ तासांचा वेळ उरला असल्याचे म्हटले आहे. या वेळेत जर कोणताही करार झाला नाही, तर परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते, असा स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिला आहे. इराणने एकतर करार करावा किंवा हॉर्मुझची सामुद्रधुनी (Hormuz Strait) खुली करावी, यासाठी यापूर्वी १० दिवसांची मुदत देण्यात आली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. Truth Social वर एक पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत.

दरम्यान, हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांनी सातत्याने विविध विधाने केली आहेत. या आठवड्यात एका भाषणादरम्यान त्यांनी दावा केला होता की, अमेरिकेने इराणला पूर्णपणे कमकुवत केले असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाईल. शुक्रवारी सोशल मीडियावर लिहिताना त्यांनी नमूद केले की, जर थोडा अधिक वेळ मिळाला तर अमेरिका सहजपणे हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करू शकते, तिथून तेल मिळवू शकते आणि मोठा नफा कमावू शकते.

ट्रम्प यांनी युद्धाच्या सुरुवातीलाच इराणची सैन्यशक्ती आणि रडार यंत्रणा जवळपास संपुष्टात आल्याचा दावा केला होता. मात्र युद्धाची प्रत्यक्ष स्थिती काहीशी वेगळी दिसत आहे. शुक्रवारी इराणने अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडल्याने खळबळ उडाली आहे. या विमानातील एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले असले तरी दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरू आहे. तसेच, अमेरिकेच्या दुसऱ्या एका विमानाचेही नुकसान केल्याचा दावा इराणने केला आहे. या घडामोडींवरून इराण अजूनही प्रत्युत्तर देण्याची क्षमता राखून असल्याचे बोलले जात आहे.