
रत्नागिरीच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने आपली ‘ऑपरेशन क्लीन-सी’ ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. बुधवारी (08 एप्रिल 2026) मध्यरात्री मिरकरवाडा बंदरात कारवाई करत, पथकाने एलईडी (LED) दिवे लावून मासेमारी करणाऱ्या ‘हलीमा मरीयम’ नावाच्या मच्छिमार नौकेला पकडले.
मिरकरवाडा समुद्र क्षेत्रात काही नौका नियमांचे उल्लंघन करून एलईडी दिवे लावून बेकायदेशीर मासेमारी करत असल्याची गोपनीय माहिती मत्स्यव्यवसाय विभागाला मिळाली होती. बुधवारी मध्यरात्री समुद्रात परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती; तुफानी वारे वाहत असतानाही विभागाच्या पथकाने धाडस दाखवून ही कारवाई केली. या मोहिमेमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ही धडक कारवाई मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात परवाना अधिकारी चिन्मय जोशी, पार्थ तावडे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर, सुजन पवार, सुरक्षा रक्षक सतीश राठोड, अमित कांबळे आणि अमोल पिलणकर यांचा समावेश होता. पर्यावरण आणि मत्स्यसाठ्याचे नुकसान करणाऱ्या एलईडी मासेमारीविरुद्ध ‘ऑपरेशन क्लीन-सी’ अंतर्गत अशीच कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.





























































