सामना अग्रलेख – तुमचाही ‘हिसाब’ होईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला कसे तोंड द्यायचे, या विवंचनेत भारतातील जनता आहे. या विवंचनेवर फुंकर घालण्याऐवजी पंतप्रधान मोदी प. बंगालमध्ये निवडणूक ‘पर्यटना’चा आनंद घेत आहेत. ‘नीरो’ बनून इशारे-नगारे वाजवीत आहेत. कालपर्यंत ते ‘सबका विकास’ अशी घोषणा करीत होते. प. बंगालमधील हल्दियामधून त्यांनी आता ‘सबका हिसाब होगा’ अशी गर्जना केली आहे. मोदीजी, ‘हिसाब’ तर सगळ्यांचाच होतो आणि वेळ आली की जनता तो करीतच असते. आज तृणमूल सरकारकडे तुम्ही ‘हिसाब’ मागत आहात, उद्या तुमचाही ‘हिसाब’ होणारच आहे हे विसरू नका!

‘सबका साथ, सबका विकास’ अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता एक नवी गर्जना केली आहे. सध्या ते त्यांच्या आवडत्या ‘मिशन’वर आहेत. म्हणजे निवडणूक प्रचार करीत फिरत आहेत. त्यात निवडणूक प्रचार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात म्हटल्यावर मोदींना जास्तच चेव येतो. हल्दिया येथील प्रचार सभेत कालपर्यंत ‘सबका विकास होगा’ म्हणणाऱ्या मोदींनी ‘सबका हिसाब होगा’ अशी नवी गर्जना केली आणि तृणमूल काँग्रेसला इशारा दिला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही तेथील प्रचारात मग्न आहेत. शहा हे तृणमूल सरकारविरोधात 14 कलमी ‘आरोपपत्र’ सादर करीत आहेत, तर मोदी हे तृणमूल काँग्रेसवर घुसखोरांची फॅक्टरी निर्माण केल्याचा आरोप करीत आहेत. ममता बॅनर्जी सरकारची संभावना ‘क्रूर सत्ता’ अशा शब्दांत करीत आहेत. निवडणूक प्रचारात प्रतिपक्षावर आरोप-प्रत्यारोप, टीका वगैरे होतच असते. मात्र मोदी-शहांचे आरोप आणि इशारे म्हणजे सगळी गंमतच आहे. शहा यांनी तृणमूल काँग्रेस सरकारविरोधात 14 कलमी आरोपपत्र’ सादर केले, पण मग तुमच्या सरकारचे काय? मोदी सरकार आणि गृहखात्याविरोधात तर 114 कलमी

आरोपपत्र

विरोधक सादर करू शकतील. शहा म्हणतात की, हे आरोपपत्र राजकीय विरोधासाठी नाही, तर ममता बॅनर्जी यांच्या दीड दशकाच्या कारभाराविरोधात आहे. या मंडळींचे हे बरे आहे. त्यांचे आरोप राजकीय नसतात, परंतु भाजप विरोधकांनी, टीकाकारांनी त्यांच्यावर केलेले आरोप मात्र ‘राजकीय’ असतात. ममता बॅनर्जी यांचा 15 वर्षांचा कार्यकाळ जर भाजपवाल्यांना भ्रष्टाचाराचा आणि अराजकतेचा ‘आरसा’ वाटत असेल तर मोदींच्या कारभाराबद्दल जनतेच्या भावना यापेक्षा वेगळ्या नाहीत. तुम्ही स्वतःला आरशात पाहिले तर तुम्हाला जनता दाखवीत असलेल्या ‘आरशा’ची प्रचीती येईल. तृणमूल काँग्रेसने प. बंगालात घुसखोरांची फॅक्टरी निर्माण केली असे म्हणणाऱ्या मोदींच्या सलग दोन राजवटींनी देशात बेरोजगारांची फॅक्टरी निर्माण केली, त्याचे काय? ममता सरकारने प. बंगालला विकासाबाबत तळाशी आणून ठेवले, असे म्हणणाऱ्या मोदींनी देशात विकासाचे कोणते दिवे लावले? ‘पाच ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेचे फुगे हवेत सोडून जनतेची दिशाभूल करण्याची वेळ तुमच्यावर का आली? या प्रश्नांचा खुलासा आधी करावा. यंदाची विधानसभा निवडणूक प. बंगालच्या

गतवैभवाची पुनर्स्थापना

करणारी असेल, असे मोदी म्हणाले. मोदी काळ हा त्यांच्या अंधभक्तांना ‘सुवर्णकाळ’ आणि देशाचे गतवैभव परत आणणारा वाटतो, परंतु या काळात देशाला ना सुवर्ण झळाळी आली ना गतवैभव प्राप्त झाले. उलट पूर्वसुरींनी देशाला मिळवून दिलेले वैभव लयालाच जाताना दिसत आहे. रशिया-युक्रेन युद्धात समाज माध्यमांवर ‘शांतिदूत’ मिरविल्या गेलेल्या मोदींना इराण युद्धातील शांती चर्चेत प्रे. ट्रम्प यांनी खड्यासारखे दूर ठेवले आणि पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर ‘शांतिदूत’ म्हणून मिरवले. तरीही पंतप्रधान ममता बॅनर्जींना गतवैभवावरून प्रश्न करीत आहेत. इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला कसे तोंड द्यायचे, या विवंचनेत भारतातील जनता आहे. या विवंचनेवर फुंकर घालण्याऐवजी पंतप्रधान मोदी प. बंगालमध्ये निवडणूक ‘पर्यटना’चा आनंद घेत आहेत. ‘नीरो’ बनून इशारे-नगारे वाजवीत आहेत. कालपर्यंत ते ‘सबका विकास’ अशी घोषणा करीत होते. प. बंगालमधील हल्दियामधून त्यांनी आता ‘सबका हिसाब होगा’ अशी गर्जना केली आहे. मोदीजी, ‘हिसाब’ तर सगळ्यांचाच होतो आणि वेळ आली की जनता तो करीतच असते. आज तृणमूल सरकारकडे तुम्ही ‘हिसाब’ मागत आहात, उद्या तुमचाही ‘हिसाब’ होणारच आहे हे विसरू नका!