
देशातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर 10 एप्रिलपासून रोख रकमेद्वारे होणारे व्यवहार पूर्णपणे बंद होणार आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना आता टोल भरण्यासाठी डिजिटल माध्यमांचाच वापर करावा लागणार आहे.
ज्या वाहनांकडे वैध फास्टॅग नसेल, त्यांना यूपीआयच्या माध्यमातून टोल भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र अशा प्रवाशांना लागू असलेल्या टोल शुल्काच्या 1.25 पट (सवापट) अधिक रक्कम मोजावी लागेल. टोल नाक्यांवरील वाहनांच्या लांब रांगा कमी करणे आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. टोल संकलनासाठी फास्टॅग हेच प्राथमिक माध्यम राहणार असून फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी यूपीआय हा पर्याय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील विविध राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस-वेवर सध्या 1,150 हून अधिक टोल नाके कार्यरत आहेत. एनएचएआयच्या फास्टॅग वार्षिक पासच्या ग्राहकांची संख्या अलीकडेच 50 लाखांच्या पुढे गेली आहे. 15 ऑगस्ट रोजी या सुविधेच्या लाँचपासून आतापर्यंत सुमारे 26.55 कोटी व्यवहार या माध्यमातून झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
- जर एखाद्या वाहनचालकाने नियमानुसार विहित पद्धतीने शुल्क भरण्यास नकार दिला, तर त्याच्यावर रस्ते नियमांतील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.
- जर कुणी फास्टॅग किंवा यूपीआयने टोल भरण्यास नकार दिला तर त्याला टोल नाक्यावरून पुढे जाऊ दिले जाणार नाही. त्या ई नोटीस जारी केली जाईल.
- तीन दिवसांच्या आता टोलची रक्कम भरली नाही, तर दुप्पट दंड लावला जाईल. नियमांचे पालन वाहनचालकांना करावे लागेल.



























































