सत्ताधाऱ्यांना कोट्यवधी,विरोधकांची लाखांत बोळवण! विकास निधीवाटपात चालबाजी; हायकोर्टाचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थायी समितीला मिळालेल्या 800 कोटींच्या विकास निधीवाटपात सत्ताधारी भाजप-शिंदे गटाकडून चालबाजी करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकांना केवळ 20 ते 25 लाख रुपये देण्यात आले असून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना तब्बल 8 ते 10 कोटींचा निधी देण्यात आल्याचे समजते. मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व नगरसेवकांना विकासनिधीचे समांतर वाटप होणे गरजेचे असताना सत्ताधाऱयानी मनमानी केल्यामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पालिकेचा 80 हजार 952 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर प्रशासनाकडून स्थायी समितीला 800 कोटींचा वाढीव विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचे वाटप नक्की झाल्याचे समजते. 800 कोटींमधून 227 नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी तर महापौर निधीसाठी 150 कोटी देण्यात आल्याचे समजते. उर्वरित 423 कोटी रुपयांचा निधी सर्वपक्षीयांना समसमान वाटप करणे अपेक्षित होते. मात्र महायुतीने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची लाखात बोळवण केल्याचे समजते. तर दुसरीकडे भाजपा व शिंदे गट महायुतीच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपये विकास निधी उपलब्ध करून दिल्याचीही माहिती आहे.

सत्ताधारी गटनेत्यांना सर्वाधिक निधी

सभागृह नेते भाजपचे गणेश खणकर यांनी 20 कोटी रुपयांचा निधी घेतला आहे. तर शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले यांनी 10 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महापौर रितू तावडे यांना सव्वा दोन कोटी तर उपमहापौर संजय घाडी यांना 10 कोटी मिळाले आहेत.