आसाम, केरळम आणि पुद्दुचेरीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान; हिंसाचाराच्या तुरळक घटना, वाढीव मतदानाचा फायदा कोणाला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाम, केरळम आणि पुद्दुचेरी या तीन विधानसभांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आसाममध्ये आतापर्यंतचे विक्रमी 86 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. केरळममध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत 78.25 तर पुद्दुचेरी येथे 89.87 टक्के मतदान झाले. पुद्दुचेरी आणि आसाममध्ये हिंसाचाराच्या घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतदानाचे प्रमाण वाढले आहे. याचा लाभ कोणाला होणार, याकडे लक्ष लागले आहे.

आसाम, केरळम आणि पुद्दुचेरी येथे विधानसभेच्या एकूण 296 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. आसाममध्ये यापूर्वीचे मतदानाचे सर्व विक्रम यंदा मोडीत निघाले. केरळम आणि पुद्दुचेरीमध्येही मोठय़ा प्रमाणात मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतरदेखील लोक रांगेत उभे असल्याचे चित्र होते. कर्नाटक, त्रिपुरा, नागालँड  येथील चार विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भरघोस मतदान झाले.

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे काळे कपडे घालून मतदान

केरळममध्ये माजी मुख्यमंत्री ओमेन चांडी यांचा मुलगा व काँग्रेसचा उमेदवार चांडी ओमेन यांनी एलडीएफ सरकारच्या निषेधार्थ काळे कपडे घालून मतदान केले. माझ्या वडिलांना अनेक वर्षे त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला.

हिंसाचाराच्या किरकोळ घटना

पुद्दुचेरीच्या मन्नादिपेट येथील मतदान पेंद्रावर काँग्रेस आणि भाजपच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आसामच्या खोवांग मतदारसंघातही हिंसाचाराची घटना घडली.