
मशिदीच्या भोंग्याद्वारे पहाटे बांग देत ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच खडेबोल सुनावले. तक्रारीनंतर कारवाई का नाही केली असा सवाल करत हायकोर्टाने याप्रकरणी पोलिसांना उत्तर देण्याचे आदेश दिले इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अन्यथा दोषी अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई करू असा इशारा देखील अधिकाऱ्यांना दिला.
कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज येथे राहणाऱ्या अॅड. रीना रिचर्ड यांनी पहाटे मशिदीतून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणा संदर्भात समता नगर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार नोंदवली मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने त्यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर आज गुरुवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.



























































