छत्रपती शिवाजी महाराज उद्यान प्रवेशद्वाराची दुरवस्था; वाई पालिकेचा निष्काळजीपणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाई शहरातील लहान मुलांचे आवडते खेळण्याचे ठिकाण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्याचे एकमेव केंद्र असलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज उद्यान’ सध्या नगरपालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे चर्चेचा विषय ठरले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील मुख्य फलक कोसळला आहे. आठवडा उलटूनही प्रशासनाने हा बोर्ड हटवण्याची किंवा दुरुस्त करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून हे उद्यान बंद अवस्थेत असून, परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. उद्यानाची स्वच्छताही करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्ड अशाप्रकारे अस्ताव्यस्त पडलेला असतानाही तो सन्मानाने बाजूला काढून ठेवण्याचे सौजन्यही प्रशासनाने दाखवलेले नाही. यामुळे वाईकर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून, नगरपालिका प्रशासनात इतकी अनास्था का भरली आहे, असा सवाल केला जात आहे.

शाळा सुटल्यानंतर दररोज मोठय़ा संख्येने विद्यार्थी या उद्यानात खेळण्यासाठी येत असतात. मुख्य गेट बंद असल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी उद्यानाच्या भिंतीवरून उडय़ा मारून आत प्रवेश करत आहेत. पडलेली झाडाची फांदी आणि तुटलेला लोखंडी बोर्ड यामुळे खेळताना एखाद्या मुलाला गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेल्या या उद्यानाची दुरवस्था पाहून शिवप्रेमींमध्येही नाराजी आहे. किमान पडलेला बोर्ड तात्पुरता बाजूला करून उद्यान स्वच्छ करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेच्या या सुस्त कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी आणि उद्यान पुन्हा मुलांसाठी खुले करावे, अशी मागणी होत आहे.