बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांनी घेतला ठाणे स्थानकाचा ताबा; ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना चालायला जागाच नाही, वाहतूक पोलिसांचा कानाडोळा, वॉर्डन हतबल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॅच नाही, योग्य गणवेश नाही, जवळच्या भाड्यांना झिडकारत प्रवाशांशी उद्धट वागणूक, नो एण्ट्रीतून भरधाव रिक्षा पळवणे, पाच प्रवासी कोंबून वाहतूक पोलिसांच्या नाकासमोरून सुसाट जाणे अशी ख्याती असलेल्या मुजोर रिक्षाचाल कांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसराचा ताबाच घेतला आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाणे स्थानकाबाहेर अस्ताव्यस्त रिक्षा थांबवून हे रिक्षाचालक प्रवाशांची कोंडी करत आहेत. प्रवाशांना चालण्यास जागाच नसल्याने अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या शेकडो रिक्षांचा चक्रव्यूह भेदून त्यांना लोकल पकडण्याकरिता धावाधाव करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे स्टेशन परिसरातील वाहतुकीची व्यवस्था लावण्यासाठी नेमण्यात येणारे वाहतूक पोलीस गायब होऊन वॉर्डनवर वाहतूक नियंत्रणाचा भार लोटत असल्याने हे वॉर्डनही मेटाकुटीला आले आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सात लाख प्रवासी प्रवास करतात. छत्रपती शिवाजी टर्मिनसनंतर अत्यंत गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाची नोंद झाली आहे. दररोज सकाळी ऑफिसला पोहोचण्याकरिता वेळेची लोकल पकडणारे आणि कामधंद्यासाठी ठाण्यात येणारे लाखो प्रवासी अक्षरशः धावाधाव करत असतात. परंतु सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुजोर रिक्षाचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत सेंटिसखाली अस्ताव्यस्त रिक्षा थांबवून शेअरिंगचे प्रवासी घेण्यासाठी जागा अडवतात. एकाच वेळी शेकडो रिक्षा प्रवाशांच्या हक्काची चालण्याची जागा अडवून थांबत असल्याने रोजच प्रचंड गोंधळ उडतो. याबाबत जाब विचारणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर हे रिक्षाचालक धावून जात मुजोरी करत असल्याने त्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. सॅटिस पुलाखाली महापालिकेने रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा दिला असतानाही अस्ताव्यस्त रिक्षा थांबवून प्रवाशांची कोंडी केली जाते.

अलोक हॉटेल चौक बनला चक्रव्यूह

ठाणे स्थानकाबाहेर अलोक हॉटेल चौक तर अक्षरशः चक्रव्यूह बनला आहे. चारही बाजूंनी रिक्षाचालक येथील रस्ता अडवून प्रवासी मिळेपर्यंत जागेवरून हलत नसल्याने सकाळी येथे वाहतुकीची तुफान कोंडी होत असते. लांबचे प्रवासी नेण्यासाठी येथे बेकायदा शेअर रिक्षा स्टॅण्ड तयार झाले आहेत. रांगा मोडून भाडे उचलणे, अवाचेसवा पैसे उकळणे अशा रोजच्या तक्रारींना कुणी वालीच नसल्याची खंत कापूरबावडी येथील प्रवासी प्राची पाटील यांनी व्यक्त केली.

वाहतूक उपायुक्तांचे दुर्लक्ष का?

नो एण्ट्रीत प्रचंड वेगाने घुसून समोरून नियमात येणाऱ्या गाड्यांना हुल देतात. या रिक्षाचालकांना रोखण्याचा प्रयत्न केला की ते इतर वाहनचालकांवर मुजोरी करतात. वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट हे वाहतूक शाखेचे जोरदार इव्हेंट करतात, पण ते या मुजोर रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश का देत नाहीत, असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे.

पोलिसांची चौकी फक्त नावालाच

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक पोलिसांची चौकी कुचकामी असल्याचा संताप प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. या चौकीवर नेमलेले पोलीस ऐन गर्दीच्या वेळी कामाचा भार वॉर्डनवर टाकून ‘पसार’ होत असल्याचा आरोपही प्रवाशांमधून केला जात आहे. वाहतूक पोलीसच रिक्षा चालकांचे ‘मित्र’ असल्यासारखे वागत असल्याने सकाळी गर्दीच्या वेळी ठाणे स्टेशन परिसर, सेंटिस परिसर, दादा पाटील वाडी येथे वाहतुकीचा अक्षरशः विचका होत असल्याचा संताप सुधीर जाधव या वाहनचालकाने व्यक्त केला.