
मुंबईकरांना शुद्ध दूध मिळावे याकरिता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) विशेष मोहिम हाती घेतली. मुंबईत असुरक्षित व निकृष्ट दूध येऊ नये याकरिता एफडीएने शहराच्या सर्व टोल नाक्यांवर फिल्डींग लावली होती. यावेळी एका दिवसात 11 हजार लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला. त्यामधील निकृष्ट साठा सील करून तो उत्पादकांकडे माघारी पाठविण्यात आला. तर 90 लीटर असुरक्षित दुध साठा हा नष्ट करण्यात आला. आयुक्त श्रीधर डुबे पाटील, सह आयुक्त चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके मुलुंड (आनंदनगर आणि एलबीएस), दहिसर, शिवडी, मानखुर्द, ऐरोली या ठिकाणी तैनात ठेवण्यात आली होती. या पथकांनी बाहेरून येणारे दुधाचे टँकर थांबवून 196 नमुने घेतले होते. अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले.




























































