कुणी पाणी देता का पाणी…रणरणत्या उन्हात मोखाड्यातील ग्रामस्थांचे टाकीखाली आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीव्र पाणीटंचाईमुळे मोखाड्यातील सायदे-जोगलवाडी येथील ग्रामस्थ हैराण आहेत. ग्रामपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजना रखडल्यामुळे ग्रामस्थांना कुणी पाणी देता का पाणी असे म्हणण्याची वेळ आली आहे. उन्हाच्या झळा सहन करत डोक्यावर हंडे घेऊन महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाणी योजना पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने आज ग्रामस्थांनी रणरणत्या उन्हात पाण्याच्या टाकीखाली आंदोलन सुरू केले आहे.

सायदे-जोगलवाडी येथील ग्रामस्थांनी २७फेब्रुवारीला पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू होऊनही नळ योजनेचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीखाली रणरणत्या उन्हात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ललित बोरदे यांनी आंदोलकांची भेट घेऊन १८ एप्रिलपर्यंत पाणी योजनेचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

… तर तालुक्याचे पाणी तोडू

आश्वासनांची पूर्तता न झाल्यास ग्रामपंचायत हद्दीत बांधलेल्या मुख्य पाण्याच्या टाकीतून तालुक्यात करण्यात येणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच राज्य महामार्गावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सिंधू झुगरे यांनी दिला.

‘हर घर जल’ योजनेला घरघर

जलजीवन मिशन योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाने ‘हर घर जल’ ही संकल्पना आणली. मात्र ही योजना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे बदनाम ठरत आहे. तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावात कामे अर्धवट आहेत. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. मोखाड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुढाकाराने जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. हे पाणी गावातील टाकीपर्यंत आणण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. पाण्याच्या टाकीतून गावातील घराघरात पाणी पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे सोपविण्यात आले आहे. मात्र निधीचे कारण देऊन मोखाड्यासह पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कंत्राटदारांनी कामे अर्धवट ठेवली आहेत. त्याचा फटका मोखाड्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीलाही बसला आहे.