शिवसेनेची अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक, अधिकाऱ्यांना धारेवर धरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झोपडपट्टी भागात राहणाऱ्या ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर आज शिवसेनेने धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अदानी कंपनीकडून झोपडपट्टीतील छोटे रूम व पहिला माळ्यावर असलेल्या खोल्यांना मीटर देणे बंद करण्यात आले होते. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींनंतर शिवसेनेने पुढाकार घेत बीकेसी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीच्या सीईओ कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवसेना नेते आमदार अ‍ॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

अदानी इलेक्ट्रिकल कंपनीतर्फे उपनगरातील झोपडपट्टी भागात मीटर देणं बंद करण्यात आले होते. तसेच गावठाण भाग व सीआरझेडचे कारण सांगून स्थानिक भूमिपुत्रांना मीटरपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या तक्रारी शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांना मिळाल्या होत्या. त्यांनी ही माहिती शिवसेना नेते आमदार अ‍ॅड. अनिल परब यांना दिली. त्यानुसार परब यांनी अदानी कंपनीचे सीईओ शेणॉय, उमेश कामत, बिझनेस हेड विकास साटम यांची भेट घेऊन सर्व मुद्द्यांवर चर्चा करत हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा अशा सूचना केल्या.

यावेळी शाखाप्रमुख संदीप शिवलकर, ठेकेदार ज्युलियन फर्नांडिस, अनंत कलमकर, मंगेश उपाध्याय, आदिफ शेख, रियाज महमद, हुसेन खाडे, अदानी विद्युत ठेकेदार, वायरमन, ग्राहक आदी उपस्थित होते.