परदेशात वाहतुकीची शिस्त पाळता ना, मग हिंदुस्थानात पण नियमांचे पालन करा- हायकोर्टाचे परखड मत; नागरी मूल्य जपा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशात गेल्यावर आपण वाहतुकीची शिस्त पाळतो. मग आपल्या देशात नियमांचे पालन करायला हरकत काय आहे, असे परखड मत उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. नागरी मूल्य जपण्याची वेळ आता आली आहे. कोणी आपल्यावर नियम पाळण्याची सक्ती करण्यापेक्षा आपणच नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. विकसित देशातील लोक गाडी चालवताना व रस्ता ओलांडताना वाहतुकीची शिस्त मोडत नाहीत. आपण परदेशात गेल्यावर या शिस्तीचे अनुकरण करतो. मायदेशी परतल्यावर नागरिकांनी ही शिस्त कायम ठेवायला हवी, असेही न्या. जितेंद्र जैन यांच्या एकल पीठाने नमूद केले.

नियमांचे पालन हे कर्तव्य आणि अधिकार अशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वाहन चालवताना व रस्ता ओलांडताना यातील एकाचे पालन करून दुसऱया बाजूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण

रस्ते अपघातात एकाचा मृत्यू झाला. याची मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिलेली भरपाई वाढवून मिळावी म्हणून अपील याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका मंजूर करताना न्यायालयाने हे परखड मत व्यक्त केले. पीडिताचे उत्पन्न 8 ऐवजी 10 हजार ग्राह्य धरून भरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

मोठे नीट राहिले तर लहान शिकतील

मोठय़ांचे अनुकरण नेहमी लहान करत असतात. लाल सिग्नल म्हणजे काहीही झाले तरी रस्ता ओलांडू नये. रस्त्यावर वाहने नसली तरी आपण थांबायला हवे. ही शिस्त पालकांनी पाळली तर मुले पण वाहतुकीची शिस्त शिकतील. तेव्हा मोठय़ांनी नियमांचे पालन करायलाच हवे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

निष्काळजी दुचाकीस्वारांवर कारवाई करा

निष्काळजीपणे दुचाकी चालवणाऱयांमुळे निष्पापांचा बळी जातो. ते गंभीर जखमी होतात. अशा दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी, असेही न्या. जैन यांनी नमूद केले.