
गेल्या कित्येक दिवसांपासून अमरनाथ यात्रेच्या नोंदणीबद्दल भाविकांना प्रश्न पडला होता. परंतु अखेर नोंदणीसाठी येत्या 15 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाच्या माहितीनुसार, यात्रेकरू देशभरातील ५५४ निश्चित बँक शाखांमार्फत नोंदणी करू शकतात. (PNB, SBI, Yes Bank, J&K Bank) या बॅंकांच्या माध्यमातून आणि SASB च्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. तसेच यात्रेसाठी आधार-आधारित बायोमेट्रिक eKYC, १३ ते ७० वयोगटातील व्यक्तींसाठी ८ एप्रिल २०२६ किंवा त्यानंतर जारी केलेले ‘अनिवार्य आरोग्य प्रमाणपत्र’ (CHC) आणि ₹२२० शुल्क या बाबी अनिवार्य असणार आहेत. विशिष्ट तारखा आणि मार्गांसाठी (बालताल किंवा पहलगाम) नोंदणी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे.
याच आधारावर प्रवास परवानेही दिले जातील. दरवर्षी अमरनाथ यात्रेला दर्शनासाठी लाखो भाविक यात्रा करतात. देशाच्या विविध भागांतील भाविक पवित्र अमरनाथ गुहेला भेट देण्यासाठी प्रवास करतात. कोणत्याही यात्रेकरूला कोणतीही अडचण किंवा अपघात होऊ नये यासाठी सरकार अमरनाथ यात्रेच्या प्रत्येक मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करते. भाविकांना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
यात्रेच्या अधिकृत तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. यात्रेकरूंना वेळेवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नोंदणी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाईल. अमरनाथ यात्रेचा एकूण खर्च प्रति व्यक्ती १०,००० ते ४५,००० रुपयांपर्यंत असू शकतो. नोंदणीसाठी अंदाजे २०० रुपये खर्च येतो. जर तुम्हाला हेलिकॉप्टरने प्रवास करायचा असेल, तर बाल्टाल/पहलगाम येथून त्यासाठी २५,००० ते ४५,००० रुपये खर्च येऊ शकतो. तुम्ही येथे पायी, पालखीतून, घोड्यावरून किंवा हेलिकॉप्टरने पोहोचू शकता. फक्त १३ ते ७० वयोगटातील व्यक्तींनाच येथे भेट देण्याची परवानगी आहे आणि त्यांच्यासोबत आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.



























































