
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना कोटी रुपयांना निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता, हे तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विकासनिधी न देणं हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रात विकासनिधी दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना कोटी रुपयांना निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता, हे तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. आणि मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही तत्व मानतो, म्हणून विरोधी पक्षाच्या आमदारांना, खासदारांना समान न्याय देईन ही भूमिका त्यांनी स्विकारली पाहिजे तरच त्यांना मोठी झेप घेता येईल. नाहीतर केंद्रात जोवर मोदी आहेत तोवरच त्यांचे महाराष्ट्रात अस्तित्व राहिल असेही संजय राऊत म्हणाले.
नगरसेवक, आमदार किंवा नगरसेवक हे विरोधी पक्षाचे उमेदवारही निवडून आलेले आहेत. ते आकाशातून टपकलेले नाहियेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. 25-25 लाखांची तुम्ही काय आम्हाला बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला 25 लाख रुपये देऊ असे संजय राऊत म्हणाले.
कुणाल कामरा हे एक स्टॅण्ड अप कॉमेडियन आहे. ते उत्तम प्रकारचे स्क्रिप्ट लिहितात. ते विंडबन करतात विटंबना करत नाहीत. विंडबन आणि विटंबना यात फरत आहेत. कुणाल कामरा यांनी हिंदी गाण्यावर एक विडंबन रचले. अशा प्रकारे आचार्य अत्रे आणि रामदास फुटाणे करायचे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तणाव निर्माण करणे विधीमंडळाच्या हक्कभंग समितीची वेळ वाया घालवणे योग्य नाही असे संजय राऊत म्हणाले.
आशिष शेलार यांचे जे विधान आहे, त्यावरुन कळतं की भाजपमध्ये सध्या वादळ सुरू आहे. त्या वादळाची ही सुरुवात आहे. एखाद्या टीममध्ये जेव्हा कुरबुरी सुरू असतात तेव्हा तो संघ हरतो. एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच जेव्हा एकमेकांचे पाय ओढण्याचे आणि एकमेकांना अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा तो संघ कोसळून पडतो.
पश्चिम बंगालमध्ये बॉम्बची फॅक्ट्री आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, गुजरातमध्ये ड्रग्जची फॅक्ट्री आहे. बॉम्बपेक्षा ड्रग्ज अधिक धोकादायक आहे. बॉम्ब एका ठिकाणी जाऊन फुटतो परंतु ड्रग्ज देशभरात जाऊन आमच्या तरुण पिढीला संपवत आहेतच. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना काही दिवस प्रतिष्ठेने रहायचे असेल तर अशा प्रकारे अभद्र गोष्टी बोलू नये असेही संजय राऊत म्हणाले.




























































