अभिप्राय – अंतर्मनातील सकारात्मक कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. व्ही. एन. शिंदे

अनेकांच्या मनात दडलेला कवी तरुण वयात, विशेषतः ‘टिनएज’मध्ये व्यक्त होत असतो. त्यामध्ये अनेकदा काव्यमूल्यांचा अभाव असतो. मात्र नुकताच अगदी तरुण कवयित्रीचा छोटेखानी काव्यसंग्रह ‘मौनातून उमटलेले शब्द’ वाचनात आला. प्रतीक्षा पाटील या शिवाजी विद्यापीठातील बी.एस्सी. संगणकशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनीचा हा काव्यसंग्रह. समजून घेणाऱया आईवडिलांसह सर्वांना हा काव्यसंग्रह समर्पित केला आहे. त्या पृष्ठामागे 2025 वर्ष कसे होते, हे काव्यरूपात मांडले आहे, ‘आरसा दाखवणारं वर्ष.’ 2025 ची शिकवण मांडताना त्या म्हणतात, ‘तू काहीच दिलं नाहीस म्हणतील लोक अनेक, पण तू दिलीस खरी ओळख – हेच आहे खरं यश एक.’

या संग्रहातील सर्वच कविता कवयित्रीच्या मौनातून आलेल्या म्हणजे अंतर्मन मांडणाऱया आहेत. त्या स्वतःच मनोगतात म्हणतात, ‘मी कविता लिहिते म्हणजे, भावना लिहिते.’ यातील सर्वच कवितांतून त्यांची कविता किती प्रगल्भ आहे, याची साक्ष मिळते. एकांतातलं आयुष्य या कवितेत म्हटले आहे, ‘एकांतातच उमजतं – आयुष्य म्हणजे गोंगाटातलं मौन नाही, तर मौनातलं आभाळ आहे…’ हे आभाळ त्यांच्या अन्य कवितातही भेटत राहते. ‘स्वतःशी मैत्री’, ‘स्वप्न’, ‘स्वतःची शोध’, ‘मी आणि माझ्यातील एकांत…’, ‘मनाशी बोलताना’, ‘चालताना आयुष्याच्या रस्त्यावर’, ‘मला सहज स्वीकारेल का समाज?’ या कवितांत त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला आहे हे जाणवते. ‘जग म्हणो अशक्य, तू विश्वास ठेव स्वतःवर, झळकव तुझेच नाव, भविष्याच्या ताम्रपटावर’ या काव्यपंक्ती याची साक्ष देतात. ‘समाज काय म्हणेल’ ही कविताही अशीच स्वशोधाची साक्ष देणारी आहे. ‘आत्महत्या हा पर्याय नाही… तूच त्याचं उत्तर आहेस’, ‘आयुष्य जगत असताना’, ‘कल्पनांचे जीवन’ या कवितांतून त्यांची जीवनविषयक सकारात्मकता आढळून येते.

जगात विविध स्वभावाची माणसे भेटतात. त्यामध्ये कधी फसवणारी माणसे भेटली, तर आपण सावध राहायला हवे, असे त्यांची कविता सांगते. धोका देणाऱयाबद्दल द्वेष कोठेही दिसून येत नाही. ‘कळत-नकळत’, ‘शिकण्याची वाट’, ‘क्रोल करताना हरवलेली पिढी’ या कविता आताच्या तरुणाईच्या कविता आहेत. संगणकशास्त्रातील काही शब्द इंग्रजीतच जसेच्या तसे कवितेत गुंफले आहेत. ‘मनातलं नातं’ ही कविता मुग्ध प्रेमाची अभिव्यक्ती आहे. दोन सावल्यामध्ये त्या लिहितात, ‘ती मला आकाश दाखवते, पण पाय जमिनीवर ठेवते.’ ‘ठरावीक वयानंतर’ कवितेत त्या नात्यांचा शोध घेतात. त्यांना आपला बाप हाच खरा सांताक्लॉज असतो असे वाटते, तसेच ‘माझ्या श्वासाचे मूळ- आई-बाबा तुम्ही’ या कवितेतही त्या आई-बाबांच्या नात्याचा आणि मुलाबद्दलच्या भावनांचा सुंदर अविष्कार पाहावयास मिळतो. ‘माझी शाळा, माझी आठवण’ ही कविता शाळेबद्दलच्या निरागस भावना व्यक्त करत वाचकाला बालवयात घेऊन जाते.

खरे तर या वयात साधारणतः सर्व कवी प्रेम कविता करतात. या संग्रहात फार कमी कविता या विषयावर आहेत. ‘तो जाणत नाही’, ‘नाती’ अशा काही कविता आहेत आणि त्या सुंदर, पक्व भावनांचे दर्शन घडवतात. एकूणच हा छोटेखानी काव्यसंग्रह नात्यांचा शोध घेत अंतर्मनाचा आवाज शब्दात मांडत असताना भविष्याचा वेध घेत जाणारा आहे. हे मनाच्या पक्वतेचे लक्षण आहे. भाषा समृद्धीचेही कवितातून दर्शन घडते. हा काव्यसंग्रह ‘मनाशी प्रामाणिक राहिलं, की आयुष्य थोडं हलकं होतं’ हे आनंदी जगण्याचे सूत्र सांगत जातो.

मौनातून उमटलेले शब्द

 कवयित्री : प्रतीक्षा पाटील
प्रकाशक : श्रीमंत पब्लिकेशन, पुणे
 पृष्ठे :  48  किंमत : 90 रुपये