
दैवी स्वरांचं चांदणं पेरून सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱया अलौकिक प्रतिभेच्या महान गायिका आशा भोसले यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ‘दम मारो दम’ची मस्ती ते ‘तोरा मन दर्पण कहलाए’ची भक्ती अशा दोन स्वरधुवांवर लीलया प्रवास करणाऱ्या आशाताई गेल्या… ‘स्वरनक्षत्र’ निखळले, अशी हळहळ रसिकांनी व्यक्त केली. कॅब्रे असो वा भजन, गझल असो वा नाट्यसंगीत… आशा भोसले यांच्या गळ्याला कोणताच गानप्रकार वर्ज्य नव्हता. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या ब्रॅडमन असतील तर आशाताई या गॅरी सोबर्स होत्या असे म्हटले जाई. सध्याच्या बॉलिवूडी गाण्यांच्या गोंगाटात ही अखेरची स्वरआशाही लोप पावली. स्वप्नांच्या प्रदेशातून आलेला हा सच्चा सूर पुन्हा स्वप्नांच्या गावी निघून गेला.
शनिवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने आशा भोसले यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या 92 वर्षांच्या होत्या.
20 भाषा… 12 हजार गाणी
आशाताईंनी 12 हजारांहून अधिक गाणी गायली. तीही वेगवेगळ्या 20 भाषांमध्ये. त्यात भावगीत, नाट्यगीतं, गझल, कॅब्रेपासून सारं काही होतं. मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी- हिंदी सिनेसृष्टीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी देशविदेशात अनेक मैफली गाजवल्या, कार्यक्रम केले. सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये त्यांची नोंद आहे.
आज अंत्यसंस्कार
सोमवारी सकाळी 11 ते 3 या वेळेत लोअर परळमधील कासा ग्रँडे येथील निवासस्थानी आशाताईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिली.































































