
जलतरण तलावात पोहणे शिकण्यासाठी जाणे पंधरा वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले आहे. स्विमिंग पूल संचालकाच्या बेजबाबदारपणने जलतरम तलावात स्विमिंग पूलमध्ये या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात असलेल्या मोहता स्विमिंग पूल मध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.
रेहान मेहनउद्दीन चौधरी (15) असे या मृत मुलाचे नाव असून तो मुजुमदार वार्ड हिंगणघाट इथला रहिवाशी होता. चौधरी कुटुंब हे मुळचे उत्तर प्रदेशातील असून हिंगणघाट शहरातील मुजुमदार वार्ड मध्ये ते मागील तीन वर्षांपासून वास्त्व्य करत आहेत. मृतक युवकाच्या वडिलांचा बेकरीचा व्यवसाय आहे. नवव्या वर्गात शिकणारा रेहान मेहनुद्दीन चौधरी हा मंगळवारी आपल्या आई सोबत स्विमिंग करण्यासाठी म्हणून मोहता स्विमिंग पूल मध्ये गेला होता. पाण्यात उडी घालताच स्विमिंग पूलमधील हिरव्या रंगाच्या दूषित पाण्यामुळे पोहण्यासाठी गेलेला रिहान हा पाण्यात दिसेनासा झाला.
दहा मिनिटे झाले मुलगा दिसत नसल्याने रेहानच्या आईने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर तेथे उपस्थितांनी शोध घेताच स्विमिंग पूलच्या तळाशी रेहान आढळून आला. यानंतर तातडीने रेहानला बाहेर काढण्यात आले आणि लगेचच हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय़ात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासताच रेहानला यावेळी मृत घोषित केले. रेहानच्या या मृत्यूची माहिती मिळताच हिंगणघाट शहरातील अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. हिंगणघाट शहरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
हिंगणघाट शहरातील वातावरण संवेदनशील झाले असून पोलिसांकडून हिंगणघाट शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखल्या जात आहे. हिंगणघाट शहरातील नागरिकांकडून आता या स्विमिंग पूल जलतरण तलावाच्या संचालका विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात असून हिंगणघाट पोलिसांकडून पुढील तपास कार्य सुरू आहे.