
शरीर सुखासाठी प्रेयसीला लग्नाची दिलेली हमी एका प्रियकराच्या चांगलीच अंगलट आली आहे. प्रेयसीने नोंदवलेला बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनुसार नोंदवण्यात आलेल्या गुह्यात काहीच दोष दिसत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
नगर येथील अमोल नेहुलने ही याचिका केली होती. न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पीडिता व माझ्यामध्ये संमतीनेच शारीरिक संबंध झाले आहेत. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी नेहुलने केली. ती अमान्य करत खंडपीठाने नेहुलची याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाचे निरीक्षण
शारीरिक संबंधांसाठी एकदा संमती दिली याचा अर्थ त्यासाठी नंतर नकार नव्हता असा होत नाही. जोडप्यामध्ये दोघांपैकी एकाने नकार दिल्यास ते शरीरसंबंध संमतीने झाल्याचा दावा फोल ठरतो.
काय आहे प्रकरण
पीडिता मुस्लिम असून तिने तलाक घेतला होता. तिला चार वर्षांचा मुलगा आहे. अमोल तिच्या शेजारी राहायला आला होता. तेव्हा तेथे त्यांची मैत्री झाली. अमोलने तिला लग्नाची मागणी घातली. माझ्याशी लग्न कर नाही तर मी आत्महत्या करीन, असे अमोलने तिला धमकावले. त्यानंतर तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. दोन-तीन वेळा त्याने पीडितेवर जबरदस्ती केली. काही दिवसांनी अमोलने विवाहास नकार दिला. तू वेगळय़ा धर्माची आहेस. मी तुझ्यासोबत विवाह करणार नाही. लग्नासाठी आग्रह केलास तर तुझ्या मुलाला ठार मारेन, असा अमोलने तिला दम दिला. अमोलच्या घरच्यांनी विवाहास नकार दिला. अखेर तिने अमोलविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला.