
इटलीच्या यानिक सिनरने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या आंद्रे रुबेलवर 4-6, 7-5, 6-4 असा रोमहर्षक विजय मिळवित सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा तो इटलीचा पहिलाच खेळाडू ठरला, हे विशेष.
आता सिनरच्या मार्गात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवचा अडथळा असेल. झ्वेरेवने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 3-6, 7-6, 7-5 असा पराभव केला. याच ज्वेरेवने सिनरला मागील चार लढतींत पराभूत केलेले आहे. याचबरोबर पोलंडच्या ह्यूबर्ट हर्काजने पोटरीचा स्नायू दुखावला गेल्याने माघार घेतली. त्यामुळे अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो याला पुढे चाल मिळाल्याने तो सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरीत गेला.