आर्टिफिशल इंटेलिजन्सचे (एआय) फायदेशीर की नुकसानदायी यावर जगभरात चर्चा सुरू आहेत. अशातच एआय तंत्रज्ञानाची एक वेगळी बाजू समोर आलेय. एका दुर्धर आजारामुळे शाळेत जाऊ शकत नसलेल्या एका मुलाच्या मदतीला एआय- रोबोट धावून आलाय. मुलाच्या जागी रोबोट शाळेत जातोय. त्यामुळे मुलाने मोठे शैक्षणिक नुकसान टळले आहे. 12 वर्षांचा हावर्ड कॅन्सरमुळे शाळेत जाऊ शकत नाही. जानेवारीपासून त्याची केमोथेरपी सुरू आहे. त्यामुळे शाळेतील त्याची हजेरी कमी झाली आहे. ट्विकेनहॅमच्या शाळेत हावर्ड शिकतो. जेव्हापासून हावर्डच्या आयुष्यात एक रोबोट आलाय, तेव्हापासून त्याचे आयुष्य काही अंशी बदलले आहे. हावर्डची शाळेत जाण्याची चिंता मिटलेय. रोबोटचे नाव ‘एवी हावर्ड’ आहे. ‘एवी हावर्ड’ रोबोट आता हावर्डच्या जागी शाळेत जाऊन बसतो. त्याच्या मदतीने आजारी हावर्ड घरी किंवा हॉस्पिटलमध्ये क्लास अटेंड करू शकतो. ऑडिओ-व्हिडीओ रोबोटचा हा एक इंटरॅक्टिव अवतार आहे. त्याच्या माध्यमातून हावर्ड घरी राहून शिक्षिकेचे म्हणणे ऐकतो, स्वतःचे म्हणणे मांडतो. नोट्स लिहून घेतो. वर्गात काय चालू आहे, हे हावर्डला समजते.