लग्नाहून परतत असताना काळाचा घाला; भरधाव कारची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव वेगात असलेल्या कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघाताची घटना चंद्रपूरमधील ब्रम्हपुरीजवळ घडली आहे. आज पहाटे 4 वाजता ही अपघाताची घटना घडली आहे. सदर कार लग्नावरून वडसाला येथे परतत होती. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दिलीप परसवानी आणि महेक परसवानी अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जितेंद्र, गौरव आणि उदय अशी जखमींची नावे आहेत. जखमींना ब्रम्हपुरीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशातही भीषण अपघात

दरम्यान, आग्रा-लखनऊ महामार्गावर स्लिपर बस आणि दुधाच्या टँकरमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात 18 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.