
IIT कानपूरमध्ये पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मागील 22 दिवसांत दुसऱ्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळल्याने सर्वजण हादरून गेले आहेत. मृत विद्यार्थी रामस्वरुप इशराम PHD करत होता. पत्नी आणि बारक्या मुलीसह तो IIT कॅम्पसमध्येच वास्तव्याला होता. अचानक रामस्वरुपने टोकाचं पाऊल उचलल्याने पत्नी आणि लहान मुलगी पोरकी झाली आहे. या प्रकारामुळे IIT कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे.
कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास IIT च्या AA-21, न्यु एसबीआरए बिल्डींगमधील सहाव्या माळ्यावरून रामस्वरुपने उडी मारली. उपस्थित कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नैराश्यातून रामस्वरुपने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. मृत रामस्वरुप मुळ राजस्थानातील चुरू जिल्ह्याचा रहिवासी होता. पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीसोबत तो कॉलेज परिसरामध्ये वास्तव्याला होता. IIT कानपूरमध्ये मागील 26 महिन्यांमध्ये जवळपास 9 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.



























































