पूर्वीच्या भांडणातून तरुणावर तलवार हल्ला, जयसिंगपूरमध्ये तिघांवर गुन्हा

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जयसिंगपुरातील नांदणी नाका रस्त्यावर तरुणावर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात सुनील रामाप्पा लमाणी (वय 28, रा. नांदणी नाका, लमाणी वसाहत, धरणगुत्ती, ता. शिरोळ) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी विनोद कासू पवार, अरविंद कासू पवार (दोघे रा. कालीबागतांडा, एलटी, विजयपूर), विनोद बाबू जाधव (रा. नांदणी नाका, लमाण वसाहत, धरणगुत्ती) या तिघांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असले, तरी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील लमाणी यांचे वडील लघुशंकेकरिता गेले होते. सुनील व त्याची आई वाट पाहत रस्त्यावर थांबले होते. यावेळी तिघे संशयित मोटारसायकलवरून आल्यानंतर त्यातील संशयित विनोद पवार याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने सुनील याच्यावर तलवारीने वार केला. पाठीवर वार झाल्याने सुनील जखमी झाला. त्यानंतर प्रतिकार करत सुनील व त्याच्या आईने संशयितावर दगडफेक केल्यानंतर संशयित पसार झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.