वसईच्या समुद्रात रिंगण; बोट अडकली, मच्छीमारांमध्ये घबराट

निसर्गरम्य वसईचा समुद्र सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मच्छीमार व निळाक्षार समुद्र यांचे अतूट नाते आहे. मात्र आज अचानक वसईच्या समुद्रात भोक्ऱ्यासारखे गोल रिंगण दिसले आणि एकच घबराट उडाली. या रिंगणात एक मच्छीमार बोटही अडकली. पण प्रयत्नांची शर्थ करून ही बोट कशीबशी किनाऱ्यावर आणली. समुद्रातील या ‘रिंगण’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तज्ज्ञांनी या घटनेचा अभ्यास सुरू केला आहे.

वसईच्या पाचूबंदर येथील एक मासेमारी नौका मासेमारीसाठी गेली असता त्यांना खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले. या घडलेल्या प्रकारानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर मच्छीमार बांधवामध्ये चिंतेचे वातावरण आहे. वसई पश्चिमेतील अर्नाळा, वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्लाबंदर या भागातील मोठ्या संख्येने कोळी बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. यासाठी मच्छीमार खोल समुद्रात मासेमारीसाठी घेऊन जात असतात.

इंजिनचा वेग वाढवला
कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची पाचूबंदर येथील ‘ओम नमः शिवाय’ ही बोट समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. एका ठिकाणी मोठे रिंगण तयार झाल्याचे मच्छीमारांना दिसून आले. बोट काही काळ या ठिकाणी अडकली होती. इंजिनचा वेग वाढवून मच्छीमारांनी ही नौका बाहेर आणली.

मत्स्य विभागाने घेतली दखल
समुद्रातील रिंगणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर तटरक्षक दल व नौदलाला कळवण्यात आले आहे. वसईच्या समुद्रात प्रथमच असे रिंगण तयार झाल्याने त्याची गंभीर दखल मत्स्य विभागाने घेतली आहे. समुद्रातील कोणत्या बदलामुळे रिंगण निर्माण झाले याचा शोध सध्या सुरू आहे.