
नैराश्येतून 56 वर्षीय महिलेने अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. कॅब चालकाची सतर्कता आणि वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे महिलेचे प्राण वाचले. ही महिला मुलुंड येथील रहिवासी आहे.
महिला शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास अटल सेतूवर गेली होती. पुलाच्या संरक्षण कठड्याच्या पलिकडे ती बसली होती. ती संशयास्पद स्थितीत बसली असल्याचे पाहून कॅब चालकाने तात्काळ न्हावा शेवा वाहतूक पोलिसांना खबर दिली. त्यावर माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी ललित शिरसाट, किरण म्हात्रे, यश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून महिलेने पूलावरुन खाडीत उडी घेतली. त्याच क्षणी जवळ उभ्या असलेल्या कार चालकाने तिचा हात पकडला आणि जीवावर बेतणारा प्रसंग टळला.
नैराश्येतून जीवन संपवण्याच्या हेतूने 56 वर्षीय महिला अटल सेतूवर पोहचली. तिने उडी घेताच कॅब चालकाने सतर्कता दाखवत महिलेचा हात पकडला अन् तिच्या आयुष्याची दोरी तुटता तुटता वाचवली. pic.twitter.com/4JHsFPuKD2
— Saamana (@SaamanaOnline) August 16, 2024
अटक सेतूवर धाव घेतलेले पोलीस पुलाच्या सुरक्षा कठड्यावर चढले आणि त्यांनी महिलेला सुरक्षितरित्या वर खेचले. धाडसी कार चालक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महिलेचे प्राण वाचले आहेत. ही महिला नैराश्याने त्रस्त होती आणि जीवन संपवण्याच्या उद्देशाने ती पुलावर आली होती.