
केडीएमसीने वीज बचतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. कल्याण-डोंबिवलीतील स्ट्रीट लाईट आता सोलरवर चालवले जाणार असून नागरिकांना रात्री लखलख चंदेरी दुनियेचा अनुभव मिळणार आहे. केडीएमसीचा ‘नेट झीरो एनर्जी’चा संकल्प असून डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात दुसऱ्या सोलार हायमास्टचे उद्घाटन करण्यात आले. कल्याण येथील गणपती चौकात पहिला हायमास्ट बसविण्यात आला होता.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते सोलार हायमास्टचे उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले, आपले उद्दिष्ट स्पष्ट असून महापालिका क्षेत्रातील प्रत्येक हायमास्ट आणि प्रमुख इमारती सौरऊर्जेवर चालल्या पाहिजेत. कल्याण-डोंबिवली शहरातील १४४ हायमास्ट पूर्णपणे सोलरवर आणण्याचे नियोजन आहे. तसेच महापालिकेच्या सर्व प्रशासकीय आणि शासकीय इमारतींवरही सोलर सिस्टीम बसवले जाणार आहेत.
‘नेट झीरो एनर्जी’ संकल्पामुळे वीज बचत, खर्चात बचत, प्रदूषण नियंत्रण आणि ग्रीन एनर्जी निर्माण होऊन कल्याण व डोंबिवली शहर एक सस्टेनेबल शहर म्हणून पुढे येईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत, पॅनासोनिक इंडियाचे संदीप जयपाल, राजा मुखर्जी आणि सचिन ठुबे तसेच कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
वीज बचतीसाठी नियोजनबद्धता
आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून ‘सस्टेनेबिलिटी अॅण्ड सेफ्टी ऑफ सोसायटी बिल्डकॉन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार शहरातील सोसायट्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. या मोहिमेंतर्गत वेस्ट मॅनेजमेंट, सोसायटी इमारतींवर सोलर पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, वेस्ट वॉटरचा पुनर्वापर आणि ग्रीन प्लांटेशन यासाठी सोसायट्यांना काम करावे लागणार आहे.






























































