गद्दार मिंधे ठाण्यातून कल्याणला हेलिकॉप्टरने जातात, लोकांना मात्र खड्डे! आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र

गद्दार मिंधे उपमुख्यमंत्री ठाण्याहून कल्याणला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करायला लागले आहेत. एवढ्याशा अंतरासाठी त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर आहे, पण लोकांसाठी मात्र खड्डे आहेत, असे टीकास्त्र शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोडले.

आदित्य ठाकरे यांनी विधान भवन आवारात पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. कल्याण-शीळ रोडवरील वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला पलावा पूल उद्घाटनानंतर काही वेळातच बंद करण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पलावाच्या रस्त्याची आताची आणि आधीची परिस्थिती बघा, मुंबई व पुण्यातील रस्त्यांचे हाल बघा, समृद्धी महामार्ग बघा, सर्वच ठिकाणी खड्डे झाले आहेत. मुंबईतून जाणारा कुठलाही महामार्ग बघा, तिथेही खड्डे आहेत. कारण भ्रष्टनाथ शिंदेंनी त्यात पैसे काढले आहेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी तोफ डागली.

दाऊद, मिर्ची, कुत्ता भाजपमध्येच

इकबाल मिर्चीसोबत ज्यांनी व्यापार केला, सलीम कुत्तासोबत जे नाचले ते भाजपमध्ये आहेत, कदाचित दाऊदही त्यांच्या पक्षातील असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.