
सरकारकडे लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाहीत, मग बेडवर सिगारेट फुंकणाऱ्या मंत्र्यांच्या बॅगेत खोके येतात कुठून? असा जळजळीत सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सत्ताधाऱ्यांना केला. सत्ताधाऱ्यांकडे वॉशिंग मशीन असल्यामुळे त्यांच्या घरी ईडी जाईल की नाही याबाबत शंका असून येत्या महापालिका निवडणुकीत जनताच अशा मंत्र्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
वसईतील जूचंद्र येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शिवसेना शाखेचे उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. 53 वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वसई तालुक्यात शिवसेनेच्या 101 शाखांचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एकीकडे राज्याची आर्थिक स्थिती पार ढासळली असून अंगणवाडी सेविकांनादेखील वेळेवर पगार मिळत नाही. पुढील वर्षी महापालिकांमधील कर्मचाऱ्यांनाही पगार मिळेल की नाही याची शाश्वती देता येत नाही. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी महाराष्ट्र अक्षरशः लुटला असल्याची टीका त्यांनी केली. मराठी भाषा व महाराष्ट्राचा अपमान शिवसेना सहन करणार नाही, असे त्यांनी विरार येथील घटनेचा दाखला देत सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख प्रविण म्हाप्रळकर, जुचंद्र विभागप्रमुख हृदयनाथ भोईर, काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव विजय पाटील, लोकसभा संघटक विवेक पाटील, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, पालिकेतील माजी विरोधी गटनेते विनायक निकम, उपजिल्हाप्रमुख जनार्दन म्हात्रे, दिलीप चेंदवणकर, किरण म्हात्रे, तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत, काका मोटे, शहर प्रमुख मंगेश चव्हाण, पालघर लोकसभा संघटक भावना किणी, महेश राऊत, अजय ठाकूर, जनार्दन पाटील, राजाराम बाबर, भाविका पाटील, मनोहर पाटील उपस्थित होते.
भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी महाराष्ट्र अक्षरशः लुटला आहे. राज्याची आर्थिक स्थिती पार ढासळली आहे. सत्ताधारी मंत्री मात्र पैशांचे खोके मिरवत फिरत आहे. आता जनताच अशा मंत्र्यांना धडा शिकवेल.