सेवानिवृत्त पोलिसांना मुंबईत हक्काची घरे द्या आणि भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची परवड थांबवा; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेवानिवृत्त पोलिसांना मुंबईत हक्काची घरे द्या आणि भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची परवड थांबवा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मागण्या

1. सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतच हक्काची घरे मिळावीत. मुंबईच रक्षण करणाऱ्यांचा हा हक्क आहे.

2. त्यांच्या कुटुंबियांवरील दंडात्मक शुल्क कमी किंवा माफ करावे. महाविकास आघाडीच्या काळात अगदी माफक शुल्क होते. मागच्या तीन वर्षात ते वाढवण्यात आले.

3. तसेच पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी भरती काळात भरतीच्या ठिकाणी योग्य निवास व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावी.

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात यापूर्वी आपल्या सोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत पोलीस पत्नी प्रतिनिधी देखील उपस्थित होते. सदर बैठकीत या विषयावर चर्चा झाली, तथापि सेवानिवृत्त पोलीस परिवारांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक नव्हती, तरी या संवेदनशील विषयाकडे आपले लक्ष आहे, याची मला जाणीव आहे.

9 मार्च 2026 रोजी गृह राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली आल्याचे समजते. तरी या संदर्भात भविष्यात होणाऱ्या बैठकीमध्ये आम्हा लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात यावे, जेणेकरून सेवानिवृत्त तसेच सेवेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करता येईल.

त्याचप्रमाणे, सेवानिवृत्त मुंबई पोलीस अधिकारी किंवा अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांवर लादण्यात येणारे दंडणीय शुल्क हा कमी आणि माफक करण्यात यावा, ही विनंती. तसेच पोलीस दलात भरतीसाठी तयारी करत असलेल्या युवा-युवतींना त्या-त्या शहरांमध्ये पोलीस दलात भरतीच्या कालावधीत योग्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, जेणेकरून त्यांना उड्डाणपुलाखाली किंवा रस्त्यावर झोपण्याची वेळ येणार नाही, ही विनंती, असे पत्र आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.