
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटून झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने ‘एसओपी’ तयार करण्याची आग्रही मागणी शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक पदार्थांची वाहतूक करणारे वाहन युनिट तसेच बोगद्यात आग लागल्यास अग्निशमन युनिट उभारण्याची मागणी केली. त्यावर ज्वलनशील व ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱया टँकरचा अपघात झाल्यास काय करायचे त्याची एसओपी तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 3 फेब्रुवारी रोजी प्रोपेलिन या ज्वलनशील वायूचा टँकर उलटला होता. यामुळे 36 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूककाsंडी निर्माण झाली होती. तसेच प्रोपेलिन हा अतिज्वलनशील वायू असल्याने प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. याबाबत चेतन तुपे, अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
टँकरसाठी चांगल्या रस्त्यांची गरज
यावरील चर्चेत भाग घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, रसायनांची वाहतूक करणाऱया टँकरचे मार्ग आधीच ठरलेले असतात. या मार्गावरील रस्ते खराब असतील तर रसायन खाली-वर होते. त्यातून गॅस निघतात. त्यासाठी नायट्रोजन ब्लँकेट तयार करावे लागले. त्यासाठी रस्ते व्यवस्थित असणे गरजेचे आहे. बायो केमिकलचा मोठा धोका असतो. अपघात झाल्यावर अडकलेल्या लोकांना कसे बाहेर काढता येईल यासाठी एसओपीची गरज त्यांनी व्यक्त केली.
समितीची स्थापना
महामार्गावर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजनंची कार्यप्रणाली तयार करण्यासाठी भारतीय रस्ते महासभा (आयआरसी)चे माजी अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.


























































