शिवतीर्थावरील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यात प्रचंड आणि अलोट गर्दीसमोर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भाषण केले. भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजपवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीच्या आचरसंहितेवरून आदित्य ठाकरे यांनी भाजप-मिंधे सरकारवर सडकून टीका केली. दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरील आपल्या पहिल्याच भाषण आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
(शिवसैनिकांच्या घोषणांनी शिवतीर्थ दणाणून सोडले) लोकांचा आवाज पुरेसा आहे आणि लोक प्रेम देत असतात, जनता प्रेम देते. आज पहिल्यांदा मी दसरा मेळाव्यात भाषण करत आहे, संबोधित करत आहे. आपल्याशी चर्चा करत आहे. आणि मला अनेक आठवणी भरून येतात. मला आठवतं लहानपणी वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे दसरा. दसऱ्याला काय तर आज्याचं भाषण म्हणजे वंदनिय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकायला लहानपणापासून अनेकदा समोर बसलेलो आहे. मग वडिलांचं भाषण ऐकलं. 2010 मध्ये मला आठवतं, याच मंचावर याच दिवशी युवासेना स्थापन केली होती. आणि माझ्या आजोबांनी वंदनिय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तलवार हातात दिली, आशीर्वाद दिले, प्रेरणा दिली, बळ दिलं. आदित्य लढ, महाराष्ट्रासाठी लढ, या मातीसाठी लढ, या देशासाठी लढ, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातील पहिल्या भाषणाला सुरुवात केली.
याच मैदानात गेली 10 वर्षे, 14 वर्षे युवासेना प्रमुख म्हणून शिवसेना नेता म्हणून मी या मंचावर येत असतो. वडिलांची भाषणं ऐकत असतो, वडिलांचा मुख्यमंत्रीपदाचा शपविधीही पाहिलेला आहे. पण 14 वर्षांत मी कधी भाषण केलेलं नाही. कारण घरात एक प्रथा आहे. माझे वडील कधी त्यांच्या वडिलांसमोर भाषण करत नव्हते. आणि मीही आता उद्धवसाहेब आले की थांबणार आहे. हे जरी असलं तरी योगायोग असा आहे, आजचा दिवस कदाचित आजोबांचा आशीर्वाद असेल, कदाचित पंजोबांचा आशीर्वाद असेल आणि आहेच. त्यांनी कदाचित सांगितलं असेल की, आदित्य हा क्षण फार महत्त्वाचा आहे, हे साल फार महत्त्वाचं आहे. ही लढाई सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची ही आताची येणारी लढाई आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
6 जानेवारीला अरविंद सावंतसाहेबांसाठी मी गिरगावमध्ये सभा घेतली होती. लोकसभेसाठी आपण प्रचार सुरू केला होता. त्यावेळी मी सांगितलं होतं. गेली पाच वर्षे ज्या लोकसभेत आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे, ज्या लोकसभेमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे, ते साल आलेलं आहे. तसंच मी सांगतो दोन वर्षे ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ज्या वर्षाची आपण वाट पाहत होतो, 2024 ची निवडणूक कधी लागणार? राज्याची निवडणूक कधी लागणार? काल परवा मला एका अधिकाऱ्याने सांगितलं. कारण आता चर्चा सुरू आहे. आता हे सरकार शेवटच्या मिनिटाला हजारो कॅबिनेटचे निर्णय घेतंय. ज्यांना-ज्यांना महामंडळं हवी असतील मंडळ हवी असतील ती बनवताहेत. पण जे काही त्यांना बनवायचं ते बनवात. मला एकाने सांगितलं, आचरसंहिता लवकर लागणार नाही, जोपर्यंत अदानीची सगळी कामं आणि सगळे जीआर निघत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागत नाही, असं मला एका अधिकाऱ्याने सांगितलं. आणि म्हणून ही लढाई फार महत्त्वाची ठरते, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.
आज हा आपला दसरा मेळावा इथे एक सुरू आहे. खरी शिवसेना, ओरिजनल शिवसेना आणि आपलं भाग्य हे की आपल्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जोडलेलं आहे. म्हणजे उद्धवसाहेब पण आहेत, बाळासाहेब पण आहेत आणि ही आपली शिवसेना आहे. ठाकरे म्हणजे तुम्ही सगळेच. पण ही जी लढाई आहे ही महत्त्वाची एवढ्यासाठी आहे, माझ्यासाठी देखिल एवढ्यासाठी महत्त्वाची आहे, कारण ही लढाई वैयक्तिक नाही, स्वतःसाठी नाही, कुठच्या पदासाठी नाही, सरकार बनवण्यासाठी नाही तर आपल्याला महाराष्ट्रात ही जी लूट चाललेली आहे, कदाचित सुरतेच्या लुटीचा जो बदला घेत आहेत, ही लूट, हा भ्रष्टाचार, मुंबई जे विकत आहेत, हे सगळं रोखण्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. हे तुम्ही ठरवायचं आहे की, मुंबईला आपण अदानीच्या घाशात घालू देणार आहात की नाही, हे तुम्ही ठरवायचं आहे. हा निर्णय तुमच्या हातात राहणार आहे. कारण या दोन वर्षांत जर पाहिलं आपण तर दोनच गोष्टी झालेल्या आहेत, एक म्हणजे मुंबईची लूट आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, सगळे प्रकल्प असलीत त्यांचे आवडते मित्र, कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. मिंधे सरकार करत आहे. स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके म्हणून जे करत आहे, ते जर रोखायचं असेल तर आपली ही ताकद जी आहे, ही एकजूट जी आहे ती कायम ठेवावी लागेल आणि निवडणुकीत दाखवावी लागेल की, हा महाराष्ट्र आहे जो झुकणार नाही. आणि कधी विकला जाणार नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
भ्रष्टाचार… भ्रष्टाचार… भ्रष्टाचार… किती भ्रष्टाचार पाहायचा? आधी हे भाजपवाले यायचे सभा घ्यायचे तेव्हा ते एक-एक भ्रष्टाचाराचे ए टू झेड काढायचे. ए फॉर, बी फॉर, सी फॉर. एकनाथ शिंदेंनी, मिंधे सरकारनी, या भाजपनी, या खोके सरकारनी, जेवढे या महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून लुटलेलं आहे तर, ‘ए’चा जर आकडा काढायचा असेल तर 100 भ्रष्टाचार असतील, ‘बी’चा जर आकडा काढायचा असेल तर 100 भ्रष्टाचार असतील.. असे ए टू झेड प्रत्येक अक्षराला वेगवेगळे असेल अनेक भ्रष्टाचार करून ठेवलेले आहेत, असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढवला,
मुंबईचचं म्हणायचं झालं तर मागच्या वर्षी असेल किंवा या वर्षी असेल दोन मोठे घोटाळे रस्त्यांचे झाले. गेल्या मागच्या वर्षी 15 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन मी भ्रष्टाचार उघड केला होता. त्यावेळी पंतप्रधानांना सांगितलं होतं, यात तुमचं नाव खराब होणार आहे, बदनामी तुमची होणार आहे. तुमच्या हातून हे भ्रष्टाचारी काही कामं करून घेत आहेत, तुमच्याकडून भूमिपूजन ज्या गोष्टींची करत आहेत ती कधीही होणार नाहीत. मुंबईत ही कामं कधीही सुरू होणार नाहीत. सहा हजार कोटींचा रस्त्यांचा घोटाळा जेव्हा मी उघड केला तेव्हा मुंबई महापालिकेला मान्य करावं लागलं आणि एक हजार कोटी मुंबईचे वाचवले. तरी सांगतो अजूनही पाच हजार कोटींचा घोटाळा आपल्या डोळ्यादेखत आहे. एक तरी रस्ता या मुंबईत गेल्या दोन वर्षात नवीन झाला आहे का? कुणाचं तरी भाषण मी ऐकलेलं… दोन वर्षांत… आणि म्हणून… आणि म्हणून … आज कितीवेळा म्हणणार माहित नाही. पण असं म्हणत म्हणत आपल्याला आपल्यामध्ये व्यस्त ठेवत, आपल्याला जातीय दंगलीत, धर्मांच्या दंगलीमध्ये असेल, काही वादांमध्ये असेल, काही वेगळ्या विचारांमध्ये असेल, आपल्याला व्यस्त ठेवून हे खोके सरकार जे आहे 50 खोके तर खाल्ले पण प्रत्येक दिवशी हे सरकार खोके आणि खोके महाराष्ट्रातून काढत आहे, मुंबईतून काढ आहेत. मागच्या वर्षी जसा रस्त्याचा घोटाळा होता यावर्षी देखिल त्यांनी 6 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. मी आज मुंबई महापालिकेच्या आधीच्या आयुक्तांना आणि आताच्या आयुक्तांनाही सांगतो, याद राखा तुम्ही यावर सही केली तर… एक रुपयाही तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि खोके सरकारला दिला तर. एका महिन्यात आमचं सरकार येत आहे, आल्यानंतर तुम्ही विचार करा, आत राहायचं की बाहेर थांबायचंय? असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाऱ्यांना दिला.
एकही गोष्ट अशी नाही जी त्यांनी सोडली नसेल. आनंदाचा शिधा, त्यात घोटाळा. युनिफॉर्म असेल त्याच्यात घोटाळा. आज महाराष्ट्रात जाऊन पाहा, शाळेचे युनिफॉर्म कितीतरी लाख देणार होते, पण एकतरी युनिफॉर्म विद्यार्थ्याला मिळाला आहे का? ते पण दाखवलं त्यांनी क्वॉलिटी आहे, स्टँडर्ड आहे. काय क्वॉलिटी, काय स्टँडर्ड? दावोसच्या आमच्या चार दिवसांच्या दौऱ्यातून एका दिवसाच्या दौऱ्यातून आम्ही आमच्या महाराष्ट्रासाठी 80 हजार कोटींची गुंतवणूक आणून दाखवली होती. पण हेच मिंधे सरकार, हेच खोके सरकार दावोसला गेलं, मागच्या वर्षीही पण गेलं आणि यावर्षी पण गेलं, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 24 तासांत आणि दुसऱ्या वेळी 28 तासांत 40 ते 45 कोटी या दोन दिवसांच्या दौऱ्यांमध्ये उडवले आहेत. एवढे पैसे उडवणं शक्य आहे का? शक्यच नाही. पण या माणसाने उडवून दाखवलं, असा जोरदार टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
आनंदाच्या शिधात घोटाळा, युनिफॉर्ममध्ये घोटाळा, रस्त्यामध्ये घोटाळा, स्ट्रिट फर्निचरमध्ये घोटाळा, झाडांच्या कुंड्यांमध्ये घोटाळा, झाडं लावण्यात घोटाळा, मुंबईच्या कुठल्याही मार्गात घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंगमशिनमध्ये घोटाळा, सॅनिटरी पॅडमध्ये घोटाळा, एवढे घोटाळे झालेले आहेत की अनेक फाइली आपल्याकडे पडलेल्या आहेत. मी वाटच पाहतोय, आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येकाची फाइल काढणार आहे, मग तुम्ही मंत्री असाल या सरकारमधले, तुम्ही राजकीय लोक असाल किंवा अधिकारी असाल हा महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही. आत टाकल्याशिवाय थांबणार नाही. ही लूट आपल्याला आज आपल्याला थांबवायची आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
एकाबाजूला आपण पाहतोय, सर्वकाही ओरबडलं जातंय. जे काही यांच्या घशात जात नाही ते गुजरातच्या घशात जातंय. गुजरातशी आपला काही वैयक्तिक वाद नाही आणि गुजरातशी काही वैर नाही. पण जेव्हा आमच्या हक्काचं तुम्ही गुजरातला खेचून नेता ओरबडून नेता त्या गोष्टीसाठी मी लढणार म्हणजे लढणार. तरुणांना मी विचारतो, तुम्ही माझी साथ आणि सोबत देणार की नाही? कोकणात जिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल जिथे या माणसांनी, एकनाथ शिंदेंनी त्या पुतळ्यामध्ये देखिल घोटाळा केला, शिवरायांचाही पुतळा तुम्ही सोडला नाहीत. गुजरातमध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटी आहे, सरदार वल्लभभाई पटेलांचा. कितीतरी फुटांचा तो पुतळा आहे. तिथे घोटाळा नाही केला. पण आपल्या छत्रपतींच्या पुतळ्यात त्यांनी घोटाळा केला, ही भाजपा आहे, हे मिंधे सरकार आहे, असल्या मिंधे सरकारला तुम्ही कधी मतदान करणार का? जे लोक आपल्या छत्रपतींच्या पुतळ्याला सोडू शकत नाही तिथे देखिल घोटाळा करतात आणि मग मंत्री सांगतात यातून काहीतरी चांगलं निघेल, वाईटातून काहीतरी चांगलं निघेल. काय चांगलं निघेल? टेंडर मोठ्या पैशांचं काढलेलं तुम्ही, पण आज देखिल तुम्हाला सांगतो, हा महाराष्ट्र विसरणार नाही, तुम्हाला शिक्षा देणार म्हणजे देणारच, शिक्षा म्हणजे एकतर घरी बसवणार नाहीतर जेलमध्ये बसवणार. पण आमच्या महाराष्ट्रात जी लूट तुम्ही माजवली आहे, जो भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे. आणि ज्या तरुणांना तुम्ही बरोजगार म्हणून या रस्त्यावर सोडलेलं आहे, हा महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. आज महाराष्ट्रात लाखो तरुण मुलं मुली आहेत, जे शिकलेले आहेत. जे शिकलेले आहेत, शिक्षण चांगलं घेतलेलं आहे, जॉबसाठी फिरत आहेत पण नोकऱ्या कुठेही उपलब्ध नाहीत, असे हे वास्तव आदित्य ठाकरे यांनी मांडले.
महाविकास आघाडीच्या काळात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक, एकावर विश्वास होता, तो विश्वास सर्व उद्योगपतींचा होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर होता. म्हणून ही गुंतवणूक महाराष्ट्रात आणू शकलो आपण. साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो होतो. पण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राला लुटण्याचं काम सुरू आहे… एक सीएम आणि दोन हाफ डीसीएम. त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मला मिळतात की तुला मिळतात. तुला मिळतात की मला मिळतात खोके.. आपल्या महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे गुजरातला गेलेत. वेदांता फॉक्सकॉन, टाका एअर बस, बल्क ड्रग्ज पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, हे प्रकल्प मिंधे सरकारने गुजरातला पाठवले. म्हणजे सगळं काही गुजरातला नेत आहेत. यांचं सरकार चुकून आपल्या डोक्यावर बसलं तर मंत्रालयही गुजरातला नेतील. हे आपल्याला रोखायचं आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
आज तुम्ही मला विचारलंत की, आदित्य तुमचं सरकार येणारच आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, तुमच्या तीन महत्त्वाच्या प्रायऑरिटी काय असणार? तीन महत्त्वाचे मुद्दे काय असणार? पहिल्या तीन गोष्टी तुम्ही ज्याच्यावर काम करणार ते काय असणार? आज मी या महाराष्ट्राला सांगतो, नोकऱ्या… नोकऱ्या आणि नोकऱ्या… या तिन्ही गोष्टी. नंबर एकची प्रायऑरिटी नोकरी, नंबर दोनची प्रायऑरिटी नोकरी, नंबर तीनची प्रायऑरिटी नोकरी. सगळी तरुण मुलं-मुली आहेत त्यांना एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे हाताला काम. आणि हेच आपलं हिंदुत्व आहे, हृदयात राम आणि हाताला काम. आज विजयादशमी आहे, आज दसरा आहे आपल्या जो विजय प्राप्त करायता आहे तो या सगळ्या मिंधे सरकारच्या, खोके सरकारच्या जे काही अवगुण, जे काही भ्रष्टाचार, जे काही बेरोजगारी, जे काही अत्याचार या महाराष्ट्रात त्यांनी आणून ठेवलेली आहेत, ही दहा डोकी जी आहेत त्यांची, ती आपल्याला चित करायची आहेत. आणि मशालीने आपल्याला पुन्हा एकदा सुवर्णकाळाकडे न्यायचं आहे. इथे सगळी आपली महाराष्ट्रप्रेमी जी जनता आलेली आहे, तुम्ही लढायला तयार आहात का? मी लढत आहे महाराष्ट्रासाठी, मी लढत आहे भूमिपुत्रांसाठी, मी लढत आहे न्यायहक्कांसाठी, अंगावर वार घ्यायला तयार आहे. हे खोके सरकार मागून वार करतं. पुढून मागून कुठूनही वार करा. उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला तरी देखील ते लढत आहेत. तुम्ही आम्हाला साथ आणि सोबत देणार की नाही? लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? आणि जिंकायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. चिन्ह कुठलं? चिन्ह कुठलं? चिन्ह कुठलं? चला हाती मशाल घेऊया आणि विजयी होऊ या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले.