नायगाव बीडीडी प्रकल्प तयार, पण चाव्या नाहीत, किती वेळा डीप क्लिनिंग करणार?; आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Aaditya Thackeray Slams Govt Over Naigaon BDD Chawl Possession Delay Saamana

नायगाव येथील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या चावी वाटपावरून युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर सवाल उपस्थित केला. आज नायगाव बीडीडी प्रकल्पाला भेट देत असताना रहिवाशांनी अद्याप चावी वाटप झाले नसल्याची तक्रार त्यांच्याकडे केली.

या प्रकल्पाची सुरुवात १ ऑगस्ट २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव परिसरातील रहिवाशांसाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले, तरी चावी वाटप प्रलंबित असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार चावी वाटप १६ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र, घरांचा ताबा न मिळाल्याने अनेक रहिवासी अजूनही भाड्याच्या घरात राहत असून दर ११ महिन्यांनी भाड्याचा करार करावा लागत असल्याने आर्थिक ताण वाढत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

‘प्रकल्प तयार असताना किती वेळा डीप क्लिनिंग करणार?’ असा सवाल करत ‘मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने निर्णय घ्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली. तसेच आमची भेट ठरल्यावरच चावी वाटपाची तारीख पुढे आल्याचा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला. गेले दोन महिने प्रकल्प तयार असूनही चाव्या न मिळाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

‘आज येथे भेट देऊन पाहणी केली. सध्या बाहेर रेंटवर असणाऱ्या रहिवाशांना रेंट ऍग्रीमेंटचे रिन्यूअल करायचे की नाही, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान सूत्रांकडून माझी व्हिजिट लागताच माहिती मिळतेय की १६ मार्चला चावी वाटप होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येथील रहिवाशांची प्रतीक्षा संपेल व गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याचा आनंद समाधानही लाभेल’, असे आदित्य ठाकरे यांनी X पोस्टवर म्हटले आहे.