
मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा भाग कोसळून झालेल्या अपघाताबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘भाजपच्या राजवटीत माणसाच्या जिवाला किंमतच राहिलेली नाही,’ असा घणाघात त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ‘आज मेट्रोचा खांब एका रिक्षावर आणि कारवर आदळला. गेल्या वर्षी एक भिंत कोसळली होती. तर, मेट्रो-3 चा मार्ग पावसाच्या पाण्यात गेला होता. आजही पायाभूत सुविधांची कामे सुरू असलेल्या अनेक ठिकाणी सुरक्षेची काहीच काळजी घेतली जात नाही. विचित्र पद्धतीने बॅरिकेडिंग केले जाते. त्यामुळे वाहतुकीची काsंडी होते किंवा गाडय़ा उघडय़ा खड्डय़ांमध्ये पडण्याचे प्रकार घडतात. या सगळ्या घटनांसाठी पंत्राटदाराला जबाबदार धरून त्याला काळ्या यादीत टाकले जाणार का, हा प्रश्नच आहे. तसे होण्याची शक्यता नाही. काही लाखांचा दंड ठोठावल्याचे दाखवून पुन्हा त्यांनाच पंत्राटे दिली जातील,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
बांधकामाआधीच रंगकाम
‘मेट्रोचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच काही ठिकाणी खांबांना रंग लावण्यात आला आहे. त्याचा खर्च कोटींमध्ये आहे. आता काम पूर्ण झाल्यावर पुन्हा त्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातील,’ याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.
लवकरच असा दिवस येईल की…
‘मेट्रो मार्गाच्या बांधकामाचे तुकडे पडतायत, वाहतूक व्यवस्था सुरक्षित नाही, कार-बाइक खड्डय़ात पडतायत. त्यांना मदत करायला कोणी नाही असे लज्जास्पद चित्र शहरांमध्ये आहे. हे असेच सुरू राहिले तर लवकरच असा दिवस येईल की आपल्या देशात प्रवासासाठी इतर देश त्यांच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देतील,’ असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
























































