
राज्यातील पावसाळी अधिवेशन सोमवारी चांगलेच वादळी ठरले. राज्यात चड्डी बनियन गँगचे काहीही सुरू आहे, युतीधर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाईही करता येत नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जबरदस्त टोला हाणला.
राज्यातील कायदा- सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून मुख्यमंत्री त्यांच्यावर काहीही कारवाई करता येत नाही. आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर चड्डी बनियन गँग अशी टीका केली. मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळणे गरजेचं असल्याने त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्या लोकांसोबत ते बसलेत ते चड्डा बनियन गँग ते कुणालाही मारतात, काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. याबाबत त्यांनी मिंधे गट आणि मुख्यमंत्र्यांना टोला हाणला.
चड्डी बनियन गँगचे लोक कुठेही जाऊन काहीही करतात. कोणालाही मारहाण करतात, मनमानी पद्धतीने त्यांचे सर्वकाही चालते. तरीही त्यांच्यावर करावाई होत नाही. ते मुख्यमंत्र्यांकडे येतात आणि सांगतात, पहिली गल है की सारी गलती मेरी नही, चल जी है भी, तो क्या मैं तेरी नही. चड्डी बनियन गँगवाले असे बोलल्यानंतर मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक याच्यासाठी करतो की त्यांनी मोठी सहनशिलता दाखवली. ते कुणावरही कारवाई करत नाहीत. मात्र सध्या राज्यात जे सुरू आहे, मुंबईत जे सुरू आहे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. चड्डी बनियन गँगवर कडक कारवाई करावी आणि शासन काय असते ते दाखवून द्यावं असं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.