
‘दशावतार’ चित्रपटाची जगभरात चर्चा असून हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. त्याआधी फिनिक्स मॉलमधील पीव्हीआर सिनेमागृहात आज ’दशावतार’चा प्रीमियर शो दणक्यात झाला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित होते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रीमियरला उपस्थित राहून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
‘दशावतार’च्या निमित्ताने कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाटय़कला यांचा सुरेख मिलाफ अनुभवता येणार आहे. मराठीतील हा पहिलाच भव्यदिव्य सिनेमा म्हणून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी तुफान गाजली. त्यानंतर आता हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला असून उद्या सर्वत्र झळकणार आहे. प्रीमियरलाच त्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. मराठीतील सर्वच आघाडीचे कलाकार या चित्रपटाची भव्यता अनुभवण्यासाठी पोहचले. सर्वांनीच चित्रपटाची स्तुती केली आणि भरभरून शुभेच्छा दिल्या.
n आदित्य ठाकरे यांनी दिलीप प्रभावळकर यांना नमस्कार केला व चित्रपटाच्या यशासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे त्यांच्यासोबत होते.
n या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधून घेतलं आहे. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर या चित्रपटाचा टीझर झळकला होता. मराठी चित्रपटाचा डंका ‘टाईम्स स्क्वेअर’वर वाजण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तगडा अभिनय!
n या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत दिसणार असून महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर भूमिका साकारणार आहेत.
n या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर, सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली असून अजित भुरे सृजनात्मक निर्माते आहेत.