अक्षयतृतीया निमित्त श्री विठ्ठलास आमरसाचा नैवेद्य, भाविकांनीही चाखली चव

हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार अक्षय तृतीया पासून वटपौर्णिमे पर्यंत श्रीं विठ्ठल रुक्मिणीच्या महानैवेद्यामध्ये शेवयाची खीर ऐवजी आमरसाचा समावेश करण्यात आला आहे. तर श्री संत तुकाराम भवन येथील भाविकांसाठी च्या अन्नछेत्रात दुपारच्या भोजनप्रसादामध्ये देखील आमरसाचा समावेश करण्यात आला आहे. याचा अक्षय तृतीया निमित्त सुमारे 2000 ते 2500 भाविकांनी लाभ घेतला आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदू धर्मात आंब्याचा प्रसाद महत्त्वाचा मानला गेला आहे. यामुळेच आजपासून विठुरायालाही महाप्रसादात आमरस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. विठुरायाच्या परिपूर्ण महाप्रसादामध्ये लिंबू, चटणी, कोशिंबीर, पातळ भाजी, सुकी भाजी, वरण-भात, कढी, वरण-भात, पुर्‍या, भजी तर पकवान्नामध्ये पुरणपोळी, साखर भात, श्रीखंड,बेसनाचे लाडू, शेवयाची खीर आणि आमरस याचा समावेश आहे. महाप्रसादातील शेवयाच्या खिरीची जागा आजपासून आमरसाने घेतली आहे. आता वटपौर्णिमेपर्यंत श्रींच्या महाप्रसादात आमरस असणार आहे.

रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीचा पंचपकवांन्नाचा महानैवेद्य दाखवण्यात येत आहे. रुक्मिणी मातेच्या महाप्रसादात कटाची आमटी हे वेगळे पदार्थ असतात. त्यामुळे आज आता देवाच्या बरोबर देवाच्या भक्तांनाही अन्नछत्रामध्ये आमरस पोळीचा बेत मंदिर समितीच्या वतीने देण्यात येत आहे. महाप्रसादालयात भाविकांकडूनही आमरसाचा गोडवा आवडीने चाखला जात असून भक्तांनी देखील आंब्याचा रस मिळत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, आनंद (गुजरात) येथील विठ्ठल भक्ताने श्री रुक्मिणी मातेस पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केले असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.