दिल्लीत पाण्यावरून आप व भाजप आमने सामने; भाजपकडून ‘मटका फोड’ आंदोलनाच्या आडून जल बोर्डाची तोडफोड

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह अनेकांना भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अटक केली आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेपूर्वी आप सरकारला बदनाम करण्यासाठी आता पाण्याच्या मुद्दय़ांवरून दिल्लीत आप व भाजप आमनेसामने आले होते. या वेळी भाजपने ‘मटका फोड’ आंदोलन करत दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप आपने व्हिडीओ टाकत केला.

भाजपचा गमछा गळ्यात असलेले कार्यकर्ते या क्हिडीओत दिसत आहेत. हे पाहा, भाजपचे कार्यकर्ते कशा पद्धतीने दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयाची तोडफोड करत आहेत. तसेच ‘भाजप झिंदाबाद’ अशा घोषणा देत आहेत. एका बाजूला हरयाणातील भाजपा सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नाही, तर दुसऱया बाजूला दिल्लीतील भाजप कार्यकर्ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत. असा आरोप आपने केला.