
स्क्वॉशमधील हिंदुस्थानचा अव्वल खेळाडू अभय सिंहसाठी मागील वर्ष हे कारकीर्दीतील टर्निंग पॉइंट ठरले. एशियन स्क्वॉश डबल्स चॅम्पियनशिपमध्ये दुहेरी सुवर्णपदक, प्रतिष्ठेची हायडर ट्रॉफी, 11 वे पीएसए टूर विजेतेपद आणि वर्षअखेरीस स्क्वॉश वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकत अभयने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ठसठशीत छाप उमटवली. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणे हेच आमचे प्रमुख लक्ष्य असल्याचे अभयने स्पष्ट केले.
सोशल मीडियापासून दूर राहून संघ आणि खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे, हीच त्याची कार्यपद्धती आहे. मैदानाबाहेर शांत, पण कोर्टवर पूर्ण ऊर्जा आणि आक्रमकतेसह खेळणे हीच अभय सिंहची खरी ओळख बनत चालली आहे. आपल्याच याच कामगिरीच्या जोरावर तो जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर पोहोचला असून सध्या देशाचा आघाडीचा पुरुष स्क्वॉशपटू ठरला आहे.
वर्ल्ड कपमधील सुवर्णपदक हा क्षण केवळ वैयक्तिक यशाचा नसून तो संपूर्ण देशासाठी अभिमानाचा असल्याचे अभय ठामपणे सांगतो. कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करताना वेगळा ताण जाणवला नाही. कारण संघातील प्रत्येक खेळाडू आत्मविश्वासात आणि उत्पृष्ट फॉर्ममध्ये होता, असे त्याचे मत आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यांबाबत बोलताना अभय म्हणतो की, हे सामने नेहमीच प्रचंड दडपणाचे असतात. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामना आजही ताजा आहे आणि यंदाही अशीच चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. जागतिक क्रमवारी महत्त्वाची असली तरी सध्या मुख्य लक्ष ऑलिम्पिक पात्रतेवर आहे. शिस्त, सातत्य आणि योग्य नियोजन ठेवले तर क्रमवारी आपोआप उंचावते, असा त्याचा विश्वास आहे.
































































