अभिजित

160

<< टिवल्याबावल्या >>  शिरीष कणेकर 

प्रिय (कै.) अभिजित देसाई यांस-

हे पत्र पाहून तू तुझ्या घोटून बसवलेल्या कुत्सित शैलीत म्हणशील- ‘पत्र काय पत्र? एकदम पत्र?’

त्यावरही मी चिडत नाही हे पाहून आपल्या भूमिकेचा पराभव होतोय असं तू मानून घेशील. समोरचा चिडलाच नाही तर त्याला चिडवून काय उपयोग? आपलेच प्रयत्न कमी पडतायत असं तुला वाटत असावं. कळूनसवरूनही मी तुझ्या चिडवणुकीला क्वचित बळी पडायचो. तुझा हातखंडा प्रयोग म्हणजे टेबलावर खाद्यपदार्थ ठेवलेले असताना त्यावर वाकून केस झटकणे.

‘‘काय करतोयस काय?’’ मी अनवधानानं किंचाळलो, ‘‘अरे, ते अन्न आहे आणि ते आपल्याला खायचंय.’’

‘‘माझे केस स्वच्छ आहेत.’’ तो म्हणाला, ‘‘सकाळीच साबू लावून धुतलेत.’’

‘‘धुतले असतील.’’ मी थोडा घुश्श्यातच म्हणालो, ‘‘तू पायदेखील साबणानं धुऊन त्यांना कोल्ड क्रीम लावलं असशील पण म्हणून पाय जेवणाच्या ताटात ठेवतात का?’’

तू खोडकरपणे हसलास. तुझा हेतू साध्य झाला होता. समोरच्याला अकारण डिवचणं व चिडवणं हे तू आयुष्याचं उद्दिष्ट तू का ठरवलं होतंस तुला माहीत आणि तुझ्या देवाला माहीत.

तू घरी बाहेरच्या खोलीत तुझे लता मंगेशकर व पु.ल. देशपांडे यांच्याबरोबरचे फोटो लॅमिनेट करून ठेवले होतेस. हे अगदी नॉर्मल होतं, पण तुझी ‘अभिजितगिरी’ पुढे होती. कोणाचीही त्या फोटोंवर नजर पडली की तू उपरोधानं म्हणायचास, ‘‘या फालतू लोकांना फार कौतुक आहे. फालतू-फालतू!’’

फालतू म्हणजे घरातली माणसं हे कळल्यावर कौतुकाने फोटो बघणारी माणसं उगीचच खजिल व्हायची.

शेवटी न राहवून मी तुला म्हणालो, ‘‘अभिजित, त्यांच्याजवळ उभं राहून फोटो तू काढून घेतलेस. त्यांची कॉपी तू मिळवलीस. ते लॅमिनेट तू केलेस. बाहेर टेबलावर तू ठेवलेस. मग घरची माणसं फालतू कशी?’’

‘‘फालतू-फालतू’’ तू तेच तेच बोलत राहिलास. तुला वाद घालायचा नव्हता. तुला सगळय़ांना ‘इरिटेट’ करायचं होतं. तुझा हेतू साध्य झाला होता. तुझा अंतरात्मा थंडावला होता.

आठवतंय, एकदा मला तू म्हणालास, ‘‘ही सुधीर भट वगैरे मंडळी त्यांच्या नाटकांच्या महोत्सवी प्रयोगांना जिभेवर विरघळणारी बर्फी देतात. आपल्याला नेहमी प्रश्न पडायचा की ही अशी बर्फी कुठे मिळते. मला आता कळलंय.’’

‘‘कुठे मिळते?’’ मी उत्सुकतेनं विचारलं.

‘‘कुठंही.’’ तू थंडपणे म्हणालास. ‘‘फक्त ती खूप महाग असते. आपण तिकडे बघतही नाही.’’

ऑफिसात लिहिण्यासाठी जे कागद लागतात ते तू स्वतःच्या पैशांनी महागडे विकत आणायचास. त्यावर चार-पाच ओळी मावतील एवढय़ा मोठय़ा व बटबटीत अक्षरात तू लिहायचास. ‘‘अक्षर साहित्य असं असतं काय?’’ मी तुला विचारलं होतं आणि त्यावर तू चक्क हसला होतास. लहान मुलानं आपल्या कपडय़ांना चॉकलेटची बोटं पुसल्यावर आपण हसतो तसा!

‘‘अभिजित’’ मी म्हणालो, ‘‘फोनवरून पलीकडे बायको आहे की मुलगी आहे पुरुषाच्या टोनवरून क्षणार्धात कळते.’’

तू लागलीच सहमत झालास व मनापासून हसलास.

‘‘आता हे स्वतःच्या नावावर तू कुठेतरी लिहिणार असशील’’ हा माझा शालजोडीतलाही तू हसत हसत झेललास.

तुझं तुझ्या मुलीवर विलक्षण प्रेम होतं. म्हणजे तू तिच्याशी काटाकाटी करून पंगा घेत नव्हतास असं नाही. तू अभिजित असलास तरी तीही तुझीच मुलगी होती की. आज ती ‘मेरिट लिस्ट’मध्ये येऊन डॉक्टर झाल्येय हे पाहायला तू हवा होतास. तू तिचे शेकडय़ाने फोटो काढले असतेस. त्यांचे मोठे मोठे आल्बम केले असतेस, पण तोंडानं तिचं कौतुक केलं असतंस की नाही शंकाच आहे.

माझ्या लेखनावर तू तुझी मालकी मानायचा. दुसऱ्या कोणी नक्कल केली की तुझं डोकं फिरायचं. तू त्यांचं नावही घ्यायचा नाहीस. परक्या बाईनं नवऱ्याशी लगट केलेलं बायकोला सहन होऊ नये असं काहीसं होतं.

राजेश खन्नाप्रमाणे तुला आपला चांगूलपणा व प्रेमळपणा बाहेर दिसू नये याची धडपड असायची. एक अलिप्त भाव चेहऱयावर चिकटवून तू वावरायचास. नाही म्हणायला दिलीपकुमारचं नाव निघालं की तू विरघळून जायचास.

एक दिवशी तू म्हणालास, ‘‘हे बघा, यापुढे मी तुमच्याकडे जेवायला येणार नाही. आजवर खूप जेवलोय. यापुढे कायम तुम्ही माझ्याकडे यायचं. प्रकृती बरी नसेल तर मी डबा घेऊन येत जाईन. वरण-भात व पापलेटची तळलेली तुकडी.’’

आपलं बोलणं प्रेमळपणाचं व कृतज्ञतेचं वाटेल अशी भीती वाटून की काय, तू जणू तोंड लपवून घाईघाईनं निघून गेलास.

कोणी तुझ्या लेखनाविषयी चांगलं बोललं तर मी ते तत्परतेनं तुझ्यापाशी पोहोचवत असे. त्यानंतरचे तुझ्या चेहऱयावरचे भाव अविश्वसनीय असत. तू चक्क संकोचानं गुदमरून जायचास. एरवीचा तुझा उद्धटपणा व आताचा हा संकोच दडविण्यासाठी तू उद्धटपणाचं कातडं पांघरतोस.

कोलंबीच्या खिचडीत नारळाचं दूध घातलं की तिची चव व स्तर वाढविणारा सुरमटपणा येतो. हे तू आमच्याकडे पाहिलंस. लगेच तू तुझ्या सुगरण बायकोला तशी खिचडी करायला सांगितलं. काही काळानंतर तू तिला म्हणालास, ‘‘ती नारळाचं दूध घातलेली कोलंबीची खिचडी फक्त आपल्या आपल्यात करत जा. आल्यागेलेल्यांवर ती फुकट घालवू नकोस. साल्यांना चवीतलं काही कळत नाही.’’

माझ्या बायकोला काय संबोधावं तुला कळत नसे. वहिनी वगैरे पुचाट शब्द तुला मानवत नव्हते. मग तू काहीच संबोधायचा नाहीस. त्यानं तुझा जास्तच गोंधळ उडायचा. स्वतःच निर्माण केलेल्या या जाळय़ात तू कोळय़ासारखा अडकायचास. मी तुझी गंमत बघतोय ही सिच्युएशन तुला जास्तच ऑकवर्ड करायची.

माझ्याकडे तुझ्या पहिल्या पुस्तकासाठी प्रस्तावना मागताना तू असाच घुसमटला होतास. काही उल्लेख न करता तू माझ्यासह शिवाजी पार्क मैदानाला तीन फेऱया मारल्यास. शेवटी माझ्या घराच्या जिन्याजवळ घाईघाईनं चाचरत तू मला विचारलंस.

‘‘हो, लिहीन तर काय झालं.’’ मी पटकन म्हणालो.

‘काय टेन्शन आलं होतं मला.’’ तू बोलून गेलास.

मी आश्चर्यचकित झालो. हा अभिजित होता? म्हणजे इतक्या निकट सहवासानंतर मी तुला ओळखलंच नव्हतं तर इतरांनीही तुला ओळखण्यात चूक केली असू शकेल. तूच त्यांचा शोध यशस्वी होऊ दिला नव्हतास.

तुझा एक विलक्षण अनुभव माझ्या हृदयावर कायमचा कोरला गेलाय. तुझे वडील गुजराती होते. त्यांच्याशी मराठीतून बोलताना तू त्यांना ‘नाना’ म्हणायचास व गुजरातीतून बोलताना ‘न्हाना’ म्हणायचास. ते आकस्मात गेले. मी तुला भेटायला आलो. तुझे डोळे लाल झाले होते. तू नाकानं सूं सू करीत होतास. मला पाहताच तू झटकन आत गेलास व माझ्या लेखाचं पाकीट घेऊन आलास. मी पाहतच राहिलो. त्याच कार्यालयात काम करीत असल्यानं तू माझा स्तंभ बरोबर घेऊन जायचास. माझी खेप वाचायची. आता वडील गेल्यावर काही काळ तू कामावर जाणं शक्य नव्हतं. माझा लेख अडकून पडू नये याचं त्याही अवस्थेत तू भान ठेवलं होतंस. तुला माझी किती काळजी होती याचं दुसरं उदाहरण मला नको.

जिमखान्याच्या गच्चीवर व उद्यान गणेशाच्या परिसरात तू एकदा हौसेनं माझं ‘फोटो-शूट’ केलंस. फोटोत माझा चेहरा लांबुडका व ओढलेला आला होता.

‘‘दुपारी झोपून उठल्यावर ‘शूट’ केलं की फोटो असे येतात.’’ तू म्हणालास.

‘‘फोटो असे आलेत, कारण माझा चेहराच अलीकडे तसा झालाय.’’ मी परखडपणे म्हणालो.

त्यावर तू काहीच बोलला नाहीस. मला दुखावण्याची एक नामी संधी तू खुशाल दवडली होतीस. इतर कोणाच्या बाबतीत तू असं केलं नसतंस. उतारवयातील नूतनचा उल्लेख ‘सोललेली कोंबडी’ असा तू केल्यावर तुझी आई नाराज झाली होती. त्यानंतर नूतनचा विषय निघाला की तू न चुकता ‘सोललेली कोंबडी’ म्हणायचास. ओढलेल्या शिरीष कणेकरला मात्र तू उदारहस्ते निसटू दिलं होतंस.

थँक यू, अभिजित. थँक यू. तुझं प्रेम म्हणजे वाघिणीचं दूध होतं आणि ते मला लाभले होते. आता वरून ढगावरून तू डोकं झटकलंस तरी मी रागावणार नाही. उलट हलकेच हसेन. प्रेमानं, कौतुकानं लिहिता लिहिता काही शंका आली की आजही माझा हात फोनकडे जातो, पण स्वर्गातला तुझा नंबर कसा मिळवू?….

तुझा- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या